इम्रान खान यांचा २०२४ मधील लेख चर्चेत !
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि दिग्गज माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या ठावठिकाणाबाबतचे गूढ वाढत आहे. अशात त्यांनी गेल्या वर्षी एका ब्रिटीश वर्तमानपत्रात लिहिलेला लेख चर्चेत आला आहे.
त्या लेखात इम्रान खान यांनी त्यांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर त्यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर जबाबदार असतील, असे म्हटले होते.
गेल्या काही दिवसांपासून इम्रान खान यांचा रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात मृत्यू झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. इम्रान खान यांच्या मुलानेही इम्रान खान यांच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर इम्रान खान यांच्या बहिणींनी तुरुंग प्रशासन त्यांना इम्रान खान यांना भेटू देत नसल्याचा आरोप केला आहे.
यावरून पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या गोंधळादरम्यान इम्रान खान यांच्या २०२४ मधील लेखाची पुन्हा चर्चा होऊ लागाली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे संस्थापक इम्रान खान ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहेत. त्यांना अनेक प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. तर इम्रान खान यांनी त्यांच्यावरील आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
माझे किंवा माझ्या पत्नीचे काही बरे-वाईट झाले तर…
२ मे २०२४ रोजी ब्रिटीश वृत्तपत्र द टेलिग्राफ साठी लिहिलेल्या एका लेखात, इम्रान खान यांनी लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील लष्कराने पाकिस्तानच्या राजकारणातून ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी सर्व प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. या लेखात त्यांनी पुढे म्हटले होते की, त्यांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर त्यासाठी असीम मुनीर जबाबदार असतील. याचबरोबर, “मी गुलामगिरीपेक्षा मृत्यू स्वीकारेन” असेही इम्रान खान त्या लेखात म्हणाले होते.
“पाकिस्तानी लष्करी यंत्रणेने माझ्याविरुद्ध जे काही शक्य आहे ते सर्व केले आहे. आता त्यांच्या हातात फक्त मला मारण्याचा पर्याय उरला आहे. मी जाहीरपणे सांगितले आहे की, जर माझे किंवा माझ्या पत्नीचे काही बरे-वाईट झाले, तर यासाठी जनरल असीम मुनीर जबाबदार असतील. पण मला भीती वाटत नाही, मी गुलामगिरीपेक्षा मृत्यू स्वीकारेन”, असे इम्रान खान यांनी लिहिले होते.
तुरुंग प्रशासनाचे स्पष्टीकरण
माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा कोठडीत मृत्यू झाल्याच्या अफवांमुळे पाकिस्तानच्या आदियाला तुरुंगाबाहेर परवा मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आता तुरुंग प्रशासनाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तब्येत उत्तम असल्याचे सांगत ते तुरुंगातच असल्याची माहिती दिली होती.
जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, तुरुंग प्रशासनाने म्हटले आहे की, इम्रान यांच्या प्रकृतीबद्दलच्या अफवा निराधार आहेत आणि त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय मदत मिळत आहे.
इम्रान खान यांना आदियाला तुरुंगातून कुठेही हलवण्यात आलेले नाही. त्यांच्याबाबतच्या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. ते पूर्णपणे निरोगी आहेत, असे तुरुंग प्रशासनाने निवेदनात म्हटले आहे.


