वैजापूर प्रतिनिधी/ अरविंद पवार
वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून टाकळी मध्यम प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजता पाणी सोडण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे नेते श्री. प्रकाश बापू ठुबे यांनी वेळोवेळी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असल्याचे संकेत मिळत आहेत.
टाकळी मध्यम प्रकल्पाचे उपअभियंता अश्फाक शेख यांनी पाणी सोडण्याचे अधिकृत आश्वासन दिले असून, उजव्या कालव्यातून पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पाटपाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, आतापर्यंत ३० शेतकऱ्यांनी पाणीपट्टीचे पैसे हजारे साहेब व श्री. प्रकाश बापू ठुबे यांच्याकडे जमा केले आहेत. संबंधित शेतकऱ्यांना पावत्या देण्यात येणार असून, त्या पावत्यांची झेरॉक्स प्रत उपसा सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारीवर प्लास्टिक पिशवीत बांधून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पाणीपट्टी न भरलेल्या शेतकऱ्यांच्या मोटारींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे दि. ८ फेब्रुवारीपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाणीपट्टीची पावती नसलेल्या मोटारींवर थेट कारवाई होणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
