ठाणे प्रतिनिधी :
सामाजिक न्याय, माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर, भ्रष्टाचारविरोधी लढे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणारे पत्रकार व कायद्याचे अभ्यासक विकी कुंडलिक जाधव यांना “समाजरत्न पुरस्कार २०२५” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
दैनिक चालू वार्ता तर्फे देण्यात येणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो. जाधव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून माहिती अधिकार कायदा २००५ चा प्रभावी वापर करून ग्रामपंचायतींकडून नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय सवलतींची अंमलबजावणी करून दिली आहे. करामधील ५% सूट लागू करण्यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळाला.
याशिवाय शासकीय कार्यालयांमध्ये RTI अंतर्गत जन माहिती अधिकारी व अपील अधिकाऱ्यांची माहिती दर्शनी लावण्यासाठी प्रयत्न, कालबाह्य IPC 1860 फलक हटविण्याची मोहीम, तसेच अधिकाऱ्यांनी मुख्यालयात वास्तव्यास राहावे यासाठी केलेली अंमलबजावणी ही त्यांच्या कार्यातील महत्त्वाची पावले ठरली आहेत.
कुलगाव-बदलापूर येथील सोनिवली गावासाठी स्मशानभूमी मंजूर करून घेणे, बदलापूर बस स्थानकात सार्वजनिक शौचालयासाठी लढा देणे, तसेच MIDC परिसरातील रस्ते व पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करणे, या उपक्रमांमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाणे जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची सनद लावण्यासाठी प्रयत्न करून रुग्ण हक्कांबाबत जनजागृती केली. भ्रष्टाचाराविरोधात ठोस भूमिका घेत अनेक प्रकरणे उघडकीस आणली असून काही अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात आला. ठाणे जिल्ह्यात भ्रष्टाचार निर्मूलन समिती गठित करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत.
निवडणूक आचारसंहिता कालावधीत नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावे, तसेच भारतीय संविधानातील हक्क व कर्तव्यांविषयी जागरूकता निर्माण करावी, यासाठी त्यांनी सातत्याने जनजागृती केली आहे. खाजगी वाहनांवरील अनधिकृत शासकीय चिन्हे काढण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून आदेश मिळवून देणे, हे देखील त्यांच्या कार्यातील उल्लेखनीय पाऊल ठरले.
पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक न्यायासाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या जाधव यांना २०२४–२५ मध्ये “उत्कृष्ट पत्रकार” म्हणूनही सन्मानित करण्यात आले होते.
समाजरत्न पुरस्कार २०२५ हा सन्मान जाधव यांच्या कार्याला मिळालेली अधिकृत दखल असून, हा सन्मान समाजसेवेची जबाबदारी आणखी वाढवणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
