पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यांची जबाबदारी तरुण नेतृत्वावर…
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर शहर तसेच उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या शहर प्रमुख पदाची जबाबदारी तरुणांवर सोपवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील महत्वपूर्ण जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याकडे पाहिले जाते. नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीमध्ये अपयश मिळाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेची परिस्थिती अगदी बिकट बनली आहे.
अशा परिस्थिती पक्षाची कमान उमद्या तरुणांवर सोपवण्यात आली आहे. कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्यातही याचा रणनितीचा अवलंब करत उद्धव ठाकरेंनी सोलापूर जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. संबधित पदाधिकाऱ्यांची नावे आज सामनामधून जाहीर करण्यात आली आहेत.
यांच्यावर सोपवली जबाबदारी
कोल्हापूर उत्तर शहर प्रमुख पदावर युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मंजीत माने, कोल्हापूर दक्षिण शहर प्रमुख विशाल देवकुळे, इचलकरंजी शहरप्रमुख शिवाजी संभाजी पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील महिला संघटीका यांची देखील नावे जाहीर करण्यात आली. सोलापूर शहर व अक्कलकोटसाठी मीरा नवले, सांगोला व पंढरपूरसाठी स्मिता सावंत, मोहोळ व माढासाठी करुणा घाडगे यांची निवड करण्यात आली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर कमी जागा आणि उमेदवारी न मिळाल्यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. अशातच उद्धव ठाकरेंनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत.
