पालघर प्रतिनिधी मिलिंद चुरी
पालघर : सामाजिक सलोखा आणि ऐतिहासिक परंपरेचा भाग मानल्या जाणाऱ्या संत सेवालाल महाराज जयंतीकडे सेलवाली ग्रामपंचायतीने कथितपणे पूर्णपणे पाठ फिरवल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी असलेल्या जयंतीदिनी कोणताही अधिकृत कार्यक्रम, अभिवादन समारंभ किंवा जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला नसल्याचा दावा राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राज्य समन्वयक श्री. रवि भगवान राठोड यांनी केला आहे.
या संदर्भात गटविकास अधिकारी, पंचायत समिती पालघर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचलित परंपरेनुसार महापुरुषांच्या जयंती ग्रामपंचायत स्तरावर साजऱ्या करणे अपेक्षित असते. मात्र सेलवाली ग्रामपंचायतीने या कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या बाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
“जयंती साजरी न केल्यामुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून सामाजिक असंतोष निर्माण झाला आहे,” असे राठोड यांनी नमूद केले आहे. ग्रामपंचायत ही शासन व नागरिक यांच्यातील महत्त्वाची दुवा संस्था असताना शासन निर्णय व परिपत्रकांकडे दुर्लक्ष करणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणी सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, नियमांचे उल्लंघन आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच योग्य कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
या आरोपांबाबत पंचायत समिती प्रशासन या तक्रारीवर कोणती भूमिका घेते, याकडे आता समाजाचे लक्ष लागले आहे.
