मध्यरात्री रक्तरंजित राडा; एकाच वेळी तिघांची निर्घृण हत्या…
नांदेड शहरात शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या एका हाणामारीच्या घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. शहरातील कॅनाल रोड परिसरात, डी-मार्टच्या नजीक झालेल्या या रक्तरंजित राड्यात तिघांचा मृत्यू झाला आहे.
टोळीयुद्धातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस घटनेचा तपा करत आहेत.
नेमकी घटना कशी घडली?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री १ ते १:३० च्या दरम्यान घडली. कॅनाल रोडवरील डी-मार्टजवळ अचानक काही तरुणांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. ही हाणामारी इतकी भीषण होती की त्यात तिघांचे बळी गेले. मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी दोन जणांचा मृत्यू घटनास्थळीच झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गँगवारमधून रक्तरंजित राडा
ही हाणामारी नेमकी कशामुळे झाली, याचे ठोस कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र ही घटना ‘गँगवार’मधून घडल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसराची नाकेबंदी करून तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळाचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने भेट दिली असून, पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं आहे.
पोलीस तपासाला वेग
सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणेकडून अत्यंत गांभीर्याने केला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या घटनेमागे मूळ कारण काय, याचा शोध घेतला जात आहे. मध्यरात्री तिघांची अशाप्रकारे हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
