दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा मोहोळ: प्रतिनिधी-राज खरात
अगोदर घेऊन दिलेला मोबाईल फुटल्याने मुलगा सतत आई-वडिलांकडे नवीन मोबाईलची मागणी करत होता.मात्र आई-वडिलांनी थोडे दिवस थांब, आपण मोबाईल घेऊ असे म्हणल्याने नाराज झालेल्या २१ वर्षीय बीबीएच्या विद्यार्थ्यांने घरात गळफास घेऊन जीवन संपवले ही घटना मोहोळ शहरात असलेल्या एका आपार्टमेंट मध्ये शनिवारी दिनांक चार एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. मोबाईलच्या कारणावरून स्वतःचा अमूल्य जीव संपवलेल्या मुलाचे नाव प्रणव जगदीश मायाचारी असे आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश गुरुलिंग मायाचारी यांचे मोहोळ शहरातील मुख्य रस्त्यावर इलेक्ट्रॉनिक दुकान असून ते मोहोळ पुणे रस्त्यालगत असलेल्या एका अपार्टमेंट मध्ये राहण्यास आहेत.
प्रणव हा एका कॉलेज मध्ये बीबीएचे शिक्षण घेत होता. त्याचा मोबाईल मागील सात दिवसापूर्वी फुटला होता त्यामुळे तो आई-वडिलांकडे मला मोबाईल घेऊन द्या,अशी मागणी करीत होता, परंतु त्याच्या आई-वडिलांनी त्यास थोडे दिवस थांब पैसे आले की आपण मोबाईल घेऊ असे समजावून सांगितले. परंतु तो नाराज झाला होता. दरम्यान ३ एप्रिल रोजी रात्री दहा वाजताचे सुमारास प्रणव हा जेवण करून घराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या खोलीत झोपण्यासाठी गेला.
दुसऱ्या दिवशी शनिवारी( ता.४) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास प्रणव हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आई-वडिलांच्या निदर्शनास आला. तात्काळ त्याचा गळफास सोडवून त्याला ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबत जगदीश मायाचारी यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून, त्यानुसार आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास मोहोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत आदलिंगे करत आहेत.या घटनेमुळे मोहोळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
