दैनिक चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी-राजेंद्र पिसे
नातेपुते : धर्मपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या नवीन इमारत बांधकामाला गती देण्यासाठी ग्रामस्थ व केल्फोस फाउंडेशन, पुणे यांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पंचायत समिती, माळशिरस येथे झालेल्या बैठकीत “मॉडेल शाळा” डिझाईननुसार बांधकामासाठी लागणाऱ्या अतिरिक्त खर्चाकरिता ₹4,00,000/- (चार लाख रुपये) रकमेचा धनादेश ग्रामपंचायत धर्मपुरीकडे सुपूर्द करण्यात आला.
या बैठकीत गटविकास अधिकारी श्री. पांढरे तसेच बांधकाम उपविभाग, माळशिरसचे उपअभियंता श्री. मुलाणी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. ठरल्याप्रमाणे व देण्यात आलेल्या हमीपत्रानुसार सदर निधी ग्रामस्थ धर्मपुरी व केल्फोस फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने ग्रामसेवक श्री. सुरेश निंबाळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नितीन पाटील, उपाध्यक्ष श्री. अविनाश पाटोळे, ग्रामस्थ श्री. दत्तात्रय झेंडे (सर) तसेच केल्फोस फाउंडेशनचे श्री. संदीप वाघ उपस्थित होते.
बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित बांधकाम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून जून २०२६ पर्यंत शाळा पूर्ण करून सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शाळेचे बांधकाम गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करणे अत्यंत गरजेचे असून प्रशासनाने या कामाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.
