ठाणे प्रतिनिधी (नागेश पवार) दिवा:-ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समिती हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे व गोदामे उभारली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर बांधकामे सुरू असून, यामुळे परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच महानगरपालिकेच्या महसुलालाही मोठ्या प्रमाणावर फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे.
या संदर्भात ॲड. रोहिदास मुंडे यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तसेच, न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला असून, परिस्थितीवर नियंत्रण न ठेवल्यास पुढील काळात न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, दिवा परिसरात वाढत चाललेल्या अनधिकृत बांधकामांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने संयुक्त पाहणी करून अशा बांधकामांवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.
