ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी,विकी जाधव
डिंग्रजवाडी हे गाव राज्यातील आदर्श आणि स्वयं-समृद्ध ग्राम म्हणून नावारूपास येत आहे. स्वच्छता, शिक्षण, पाणी व्यवस्थापन, आरोग्य, शेती आणि सामाजिक एकोपा या मजबूत आधारस्तंभांवर उभे राहून गावाने ग्रामीण विकासाचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी ग्रामगीता तसेच महात्मा गांधी आणि अण्णा हजारे यांच्या विचारांवर आधारित आत्मनिर्भरता, व्यसनमुक्ती आणि समाजसेवा या तत्त्वांचा अवलंब केला आहे. त्यामुळे डिंग्रजवाडी हे गाव खऱ्या अर्थाने “आदर्श व समृद्ध ग्राम” म्हणून विकसित झाले आहे.
गावात स्वच्छ रस्ते, सुसज्ज ड्रेनेज व्यवस्था, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट आणि घनकचरा व्यवस्थापन यामुळे स्वच्छतेचा उच्च दर्जा राखला जात आहे. ग्रामपंचायत इमारत, आरओ पाणी प्रकल्प तसेच वृक्षारोपण आणि हरित उपक्रमांमुळे गावाचे सौंदर्य अधिक खुलले आहे.
शिक्षण व आरोग्य क्षेत्रातही गावाने उल्लेखनीय प्रगती साधली असून १०० टक्के साक्षरता, दर्जेदार प्राथमिक शिक्षण, अंगणवाडी सुविधा आणि खेळाचे मैदान उपलब्ध आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी नियमित आरोग्य व रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे.
आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सिंचन सुविधा आणि शेळी, मेंढी, गाय-म्हैस यांसारख्या जोडधंद्यांचा मोठा हातभार लागला आहे. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून बचत गट, दिव्यांग आणि इतर घटकांचे सक्षमीकरण करण्यात आले आहे.
सामाजिक एकोपा हे गावाचे वैशिष्ट्य ठरले असून जातिभेद बाजूला ठेवून ग्रामसभेत सर्वांचा सक्रिय सहभाग दिसून येतो. शासन आणि ग्रामस्थ यांच्यातील विश्वास तसेच पारदर्शक कारभारामुळे गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. बिनविरोध निवडणुका ही गावाची विशेष ओळख ठरली आहे.
डिंग्रजवाडीने हिवरे बाजार व राळेगण सिद्धी यांसारख्या आदर्श गावांचा अभ्यास करून त्यांच्या यशस्वी मॉडेलचा अवलंब केला आहे. त्यामुळे गावाने विकासाच्या मार्गावर यशस्वी वाटचाल साधली आहे.
“ग्रामविकास हाच राष्ट्रविकासाचा आत्मा आहे,” हा संदेश देत डिंग्रजवाडी हे गाव इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

