शिंदेंच्या आमदाराची ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी…
दिवंगत प्राध्यापक गोविंद पानसरे यांनी 37 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून आता नवा वाद सुरू झाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या नावावर आक्षेप घेतला आहे.
संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी शिवाजी महाराजांचा अनादर केल्याचे म्हणत आंबी यांन शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय ही ऑडिओ क्लीप माझीच असल्याचं आमदार गायकवाड यांनी मान्य केलं आहे.
आमदार गायकवाड नेमकं काय म्हणाले?
या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार संजय गायकवाड म्हणतात की, “शिवाजी कोण होता? असा एकरी उल्लेख का केलाय तुम्ही शिवाजी महाराजांना एकेरी बोलता का? त्यावर प्रशांत आंबी म्हणतात की, “हे पुस्तक गोविंग पानसरे यांनी लिहिलं आहे.”
नंतर गायकवाड म्हणतात : अरे तो कोण आहे? तुला माहितेय ना गोविंग पानसरेचे काय हाल केलेत.
प्रशांत आंबी : हो माहितेय मला.
गायकवाड : मग ब्राह्मण आहे का तू?
आंबी : मी ब्राह्मण नाही.
गायकवाड : जास्त शहाणपणा करू नको मी आमदार संजय गायकवाड आहे. घरात घुसून मारेन साल्या.
आंबी : धमक्या देऊ नका.
गायकवाड : मी व्यवस्थीत बोलतोय तू लिहिलं कसं? तु राहतो कुठं?
आंबी : मी कोल्हापुरात राहतो.
गायकवाड : मी घरात घुसून मारेन. ते म्हणाले नाव आणि बदल तुझी भाषा बदलं, अशी धमकी गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, प्रशांत आंबी यांनीही संजय गायकवाडांना ‘तुम्ही उद्या माझी जीभ कापायला या’, असं प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गायकवाड म्हणाले, ज्या पद्धतीने त्याने जी मुजोरी ठेवली मी त्याला विचारत असताना तो मला सारखा डिवचतं होता.
म्हणून मी जीभ हासडायची भाषा केली आणि अशा लोकांना शंभर टक्के जीभ हासडायची भाषा केली पाहिजे. शिवाय अशा पुस्तकांमध्ये जी शिवरायांबद्दल एकेरी भाषा वापरली आहे ती आम्ही या महाराष्ट्रात नाही सहन करू शकत, असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे.
