प्रशांत आंबी धमकी प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक…
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी (कोल्हापूर) यांना कथितरित्या गलिच्छ शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
याची ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमावर धुमाकूळ घालत आहे. यावरून राज्यात पुन्हा वादळी चर्चेला तोंड फुटले असून आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका आणि कारवाईची मागणी होत आहे.
आमदारांमुळे जिल्ह्याची बदनामी: सपकाळ
आमदार संजय गायकवाड यांचे विरोधक, बुलढाण्याचे माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. आपल्या एक्स अकाउन्टवरून त्यांनी याप्रकरणी जळजळीत भाष्य केले आहे. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी गलिच्छ शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा विडाच आमदार संजय गायकवाड या व्यक्तीने उचललाय. मग ते आमदार निवासातील कँटीनमधे एका कर्मचाऱ्यास हाणामारी करणे असो, सुरक्षेसाठी नियुक्त पोलिसांना स्वतःची गाडी धुवायला सांगणे असो, की आता प्रशांत आंबी यांना धमकी असो, ही नेहमीची बाब ठरली आहे.
शिवाजी महाराजांचे नावही घेण्याची त्यांची लायकी नाही
राज्यातील एक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी पक्षातील आमदार, शिवरायांचा वंशज म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीची भाषा आणि शिव्यांची पातळी बघितली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही यांच्या ओठावर असू नये, कारण ती लायकी यांची नाही. महाराजांनी या भूमीला घालून दिलेले संस्कार भ्रष्ट करण्याचे, महाराष्ट्राची संस्कृती नासवण्याचे, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुसण्याचे काम यांच्यासारख्या विकृत व्यक्तींमुळे होते आहे, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
ही तर खुनाचीच धमकी
हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रकाशक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत आंबी यांच्या जीवाला गंभीर धोका असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे. ते म्हणतात, पुरोगामी कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना धमकी देताना ‘पानसरेचे जे हाल केले, ते करण्याची’ म्हणजे थेट खुनाची धमकी देण्यात आली आहे. यामुळे प्रकाशक प्रशांत आंबी यांना राज्य सरकारने तातडीने सुरक्षा द्यावी. सपकाळ यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ही मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
यापूर्वी, दिवंगत प्राध्यापक गोविंद पानसरे लिखित आणि तब्बल ३७ वर्षांपूर्वीच्या बहुचर्चित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून आमदार गायकवाड यांनी संताप व्यक्त केला. प्रकाशक आंबी यांना गलिच्छ शिवीगाळ करणारी आणि धमक्या देणारी त्यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली . प्रशांत आंबी यांना फोन करून शिवाजी महाराजांचा अनादर केल्याचे म्हणत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
‘गोविंद पानसरे हा छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरीत शिवाजी म्हणणारा कोण होता? मला हे पुस्तक वाचायची गरज नाही. तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत बोलतात. तुला माहितीये ना, त्या गोविंद पानसरेचं काय झालं, त्याची अवस्था काय झाली? मी तुलाही घरात घुसून मारेन, तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन,’ अशी धमकी संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना दिल्याचा आरोप आहे.
