ट्रम्प यांनी भारताला म्हटले ‘नरक’; ‘ही’ एक पोस्ट आणि संपूर्ण इंटरनेटवर ट्रोलिंगचा स्फोट…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या एका सोशल मीडिया पोस्टने भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
यावेळी ट्रम्प यांनी थेट भारताला ‘नरक’ (Hellhole) संबोधणारा आणि भारतीयांच्या अमेरिकेतील नोकऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक वादग्रस्त व्हिडिओ शेअर केला आहे. लेखक मायकल सॅव्हेज यांच्या या व्हिडिओला ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर शेअर केल्याने केवळ राजनैतिकच नव्हे, तर सामाजिक स्तरावरही मोठा वाद निर्माण झाला आहे.
भारताला ‘नरक’ संबोधल्याने भारतीयांमध्ये संताप
मायकल सॅव्हेज यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये अत्यंत खालच्या थराची भाषा वापरत भारत आणि चीनसारख्या देशांना ‘नरक’ म्हटले आहे. ट्रम्प यांनी हा व्हिडिओ केवळ शेअरच केला नाही, तर त्यातील मजकूर चार पानांच्या पोस्टमध्ये लिहून त्याला एक प्रकारे आपली अधिकृत संमती दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ‘भारत किंवा चीनसारख्या ग्रहावरील कोणत्याही ‘नरकातून’ (Hellhole) लोक अमेरिकेत येतात आणि इथली व्यवस्था बिघडवतात,’ असे विधान या व्हिडिओत करण्यात आले आहे. या विधानामुळे जगभरातील भारतीयांनी ट्रम्प यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
भारतीयांच्या नोकऱ्या आणि ‘बर्थराईट सिटिझनशिप’वर निशाणा
ट्रम्प यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. कॅलिफोर्नियातील तंत्रज्ञान क्षेत्रात आता भारतीयांचेच वर्चस्व असून, तिथे ‘गोऱ्या माणसांना नोकरीसाठी अर्ज करण्याची गरज उरलेली नाही,’ अशी विषारी टीका करण्यात आली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील भरती प्रक्रिया भारतीय आणि चिनी लोकांच्या हातात असल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे. याशिवाय, अमेरिकेच्या १४ व्या घटनादुरुस्तीनुसार मिळणाऱ्या ‘जन्मसिद्ध नागरिकत्वा’च्या अधिकारावरही ट्रम्प यांनी पुन्हा एकदा प्रहार केला आहे. एखादे बाळ अमेरिकेत जन्मले की त्याला लगेच नागरिकत्व मिळते आणि त्यानंतर ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला भारतातून अमेरिकेत बोलावतात, ही पद्धत चुकीची असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
ट्रम्प यांचा बदललेला सूर: ‘मी आधी भारताचा पाठीराखा होतो पण…
ट्रम्प यांनी ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी यापूर्वी भारतातील भारतीयांचा मोठा समर्थक होतो, पण आता इथल्या (अमेरिकेतील) परिस्थितीबद्दल माझे डोळे उघडले आहेत.’ ट्रम्प यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे अमेरिकेतील स्थलांतरित भारतीय आणि भारतीय-अमेरिकन समुदायामध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना आता या विधानाचे काय परिणाम होतील, याची भीती वाटू लागली आहे.
आंतरराष्ट्रीय संबंधांवर काय होणार परिणाम?
हा वाद केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित नसून, भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंधांवरही याचे सावट पडू शकते. ट्रम्प यांनी यापूर्वी पंतप्रधान मोदींसोबतची आपली मैत्री अनेकदा मिरवली आहे, मात्र आता थेट देशालाच ‘नरक’ संबोधल्याने भारत सरकार यावर काय अधिकृत प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी घेतलेली ही टोकाची भूमिका भारतीयांना अमेरिकेपासून दूर नेणारी ठरू शकते.
