ठाणे प्रतिनिधी नागेश पवार (दिवा): ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा स्टेशन परिसर सध्या अवैध धंद्यांचे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे सुरक्षित आश्रयस्थान बनू पाहत आहे. रात्रीच्या वेळी जिथे सर्वसामान्य आणि प्रामाणिक व्यावसायिकांना आपली दुकाने ११ ते ११:३० च्या दरम्यान बंद करण्याची सक्ती केली जाते, तिथेच दुसरीकडे काही विशिष्ट पानटपऱ्या रात्री १:३० ते २:३० पर्यंत बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
नशेखोरांची वर्दळ आणि गुन्हेगारीचा विळखा या रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या टपऱ्या केवळ व्यवसाय करत नसून, त्या नशेखोरांचे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे मुख्य अड्डे बनल्या आहेत. प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि भांग गोळ्यांच्या उपलब्धतेमुळे येथे गर्दुल्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या नशेखोर आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमुळे स्टेशन परिसरात रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या महिला आणि सामान्य प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वर्दळीतूनच वादावादी, हाणामारी आणि छेडछाडीसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून, दिवा परिसराची शांतता धोक्यात आली आहे.
प्रत्यक्ष पुराव्यानुसार, या पानटपऱ्यांवर सरकारतर्फे प्रतिबंधित असलेला गुटखा आणि भांग गोळ्यांसारख्या अंमली पदार्थांची राजरोसपणे विक्री केली जात आहे. तरुण पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणारे हे साहित्य कोणत्याही भीतीशिवाय विकले जात असताना पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) नेमकी कोणाची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
एकीकडे कायद्याचे पालन करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांवर रात्री ११ नंतर कारवाईचा बडगा उगारला जातो. मग याच स्टेशन परिसरातील काही ठराविक टपऱ्यांवर पोलिसांची ‘मेहरनजर’ का? या टपऱ्यांच्या मालकांना कोणाचे अभय लाभले आहे? गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी या टपरी चालकांचे काय संबंध आहेत? यामागे मोठा आर्थिक व्यवहार तर नाही ना? ‘पाणी कुठे मुरतंय?’ अशा चर्चांना आता दिवा परिसरात उधाण आले आहे.
नागरिकांची मागणी:
“दिव्यातील वाढती गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी या पानटपऱ्यांवर तात्काळ धाड टाकून त्या कायमच्या बंद करण्यात याव्यात. पोलिसांनी सामान्य नागरिकांना त्रास देण्यापेक्षा या अवैध धंद्यांच्या आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात.”
आता पोलीस प्रशासन या गुन्हेगारी आणि नशेच्या व्यापारावर ‘दमदार’ कारवाई करून जनतेला दिलासा देणार की ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष सुरूच राहणार? याकडे संपूर्ण दिवेकरांचे लक्ष लागले आहे.
