ममता दीदींनी सरळ राजकारण केलं असतं तर; राहुल गांधींच्या वक्तव्याने खळबळ…
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये आणि तमिळनाडूमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.
दुपारी 12 वाजेपर्यंत 40 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. दोन्ही राज्यातील निवडणूका या भाजपसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा गड फोडण्यासाठी आणि त्यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपने पूर्ण रणनीती आखली आहे. दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खास सोशल मीडिया पोस्ट करुन मतदारांना आवाहन केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केल्या आहेत. यामध्ये त्यांनी महिला व तरुण मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मात्र पश्चिम बंगालमधील व्हिडिओमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या विजयाचे संकेत दिले आहेत. त्यांनी तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित करत युती मध्ये निवडणूक लढल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, ‘पश्चिम बंगालच्या बंधू आणि भगिनींनो, या वैचारिक लढाईत भाजपला फक्त काँग्रेसच हरवू शकते. ते हक्क हिसकावून घेतात, आम्ही देतो. ते संविधान नष्ट करतात, आम्ही त्याचे रक्षण करतो. त्यांना भारताची विविधता पुसून टाकायची आहे, भाजपचे एकच विचार आहे की एक देश एक भाषा, एक संस्कृती पण आपल्या देशामध्ये अनेक संस्कृती आहेत. देशामध्ये विविध भाषा, धर्म आणि विचारधारा आहेत. आम्ही बंगालसोबत प्रत्येक संस्कृती, प्रत्येक भाषेचा आदर करतो. चला, काँग्रेसला प्रचंड बहुमताने विजयी करूया आणि बंगालमध्ये न्याय, सन्मान आणि प्रगतीचे सरकार स्थापन करूया.’असे मत राहुल गांधी यांनी मांडले आहे.
या एक मिनिट ४७ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, सुमारे एक मिनिट १५ सेकंदांनंतर राहुल गांधी म्हणतात, ‘जर ममताजींनी स्वच्छ सरकार चालवले असते, जर त्यांनी बंगालचे ध्रुवीकरण केले नसते, तर भाजपसाठी मार्ग मोकळा झाला नसता. काँग्रेस भाजपशी लढते. भाजपलाही माहित आहे की फक्त काँग्रेसच त्यांना रोखू शकते. असे स्पष्ट मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे काँग्रेस पार्टीला मत द्या आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पार्टीचे सरकार आणा, असे आवाहन राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील जनतेला केले आहे.
ते म्हणाले की, भाजप निवडणूका चोरी करते. भाजपने हरयाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये निवडणुकांची चोरी केली. SIR हे निवडणुक चोरी करण्याचा प्रकार आहे. भारतात या दोन्ही भाजप व काँग्रेसच्या विचारधारा लढत आहेत. आम्ही भारत जोडो यात्रेमध्ये दुष्मनीच्या बाजारात मोहब्बतचे दुकान उघडायचे असल्याचे मत राहुल गांधी यांनी मांडले.
