
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधत खडे बोल सुनावणारे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
आक्रोश महाराष्ट्राचा’ या दौऱ्यात आज येवला येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी नवनीत राणा प्रकरण, महाविकास आघाडीतील नेते, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांबाबत ही भाष्य केले आहे.
यावेळी बोलताना खोत यांनी म्हटले कि, मतदारांनी भाजप- शिवसेनेला सत्तेसाठी बहुमत दिले परंतु विश्वासघात करून शिवसेना सत्तेवर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले तरी ते नामधारी असून त्यांच्या बोलण्याला कुठलाही अर्थ नाही. पेरूनही न उगवलेल्या बियाण्यासारखं त्यांचं बोलणं असून त्याला पीक येत नाही अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले कि, ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हटले, की राष्ट्रवादी व काँग्रेसवाले टाळ्या वाजवत होते. आता त्यांनी गाडा रे यांना मातीत म्हटल्याबरोबर ते भाजपकडे निघाल्याचे म्हटले जातेय. आता पोटात कळा सुटायला लागल्या ? तेव्हा हसू येत होतं अशी ही बोचरी टीका खोत यांनी केली.
तसेच आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावही त्यांनी टीका केली. गावामध्ये पवार, देशमुख, पाटील, जाधव अशा नावाने लोक ओळखले जातात. पण काही लोकांना सांगावे लागते की, मी पाटील आहे. तशीच त्यांची अवस्था झाली असून पाटीलकी दाखविण्यासाठी ही धडपड सुरू असल्याची टीकाही ठाकरेवर केली.