
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा -गुणाजी मोरे
कोंढवा – येवलेवाडीतील केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सतिश शिवाजी घाटे याला युकेमधील रेजिंसन इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीत ३६ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. नांदेड जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असणारा सतीश हा प्रचंड मेहनती आहे. त्याने स्वतःच्या मेहनतीच्या जीवावर हा पल्ला गाठला असून या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून मोठे स्वप्न उराशी बाळगून मराठवाड्यातील कंधार तालुक्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या सतीशने केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातून मॅकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली आहे. आपल्या साधारण परिस्थितीची जाण आणि योग्य भान ठेवून त्याने अभ्यास केला. त्याची आई गृहिणी असून वडील नोकरी करतात. सतीशची कंपनीत कनिष्ठ अभियंता या पदावर निवड झाली असून लवकरच तो युकेमध्ये कामावर रुजू होणार आहे. सतीशची ही गरुडझेप ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून याची दखल घेत केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. या प्रवासात संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, संकुल संचालक डॉ. व्यासराज काखंडकी, कार्यकारी संचालक मेजर जनरल समीर कल्ला, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत, विभाग प्रमुख गायत्री पाटील, राजेंद्र राठोड आणि समीर पोतदार यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले आहे