
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
24 जुलै 2013, दवाखान्यात विषारी सर्पदंशाचे तीन रुग्ण होते… दिवसभराच्या कामानंतर रात्री माझ्या छातीत जळजळ करत होते. माझा ECG काढला…Normal होता.25 जुलैच्या पहाटे तीनच्या सुमारास जाग आली… छातीत प्रचंड जळजळ होती… माझी पत्नी सौ. माला व कन्या भक्तीही त्यावेळी जागी झाल्या… मी डायनिंग चेअरवर बसलो व Antacid – Histac च्या गोळ्या खाल्ल्या.. क्षणात पुन्हा माझा डावा हात दुखायला लागला… माझ्या लक्षात आलं की हा हृदयविकाराचा झटका असू शकतो… दवाखान्यातील कंपाऊंडर भास्कर इंगोलेंना मी ECG मशीन घेऊन वर बोलावलं. त्या़ंनी माझा ECG काढला… त्यात मला हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याचं समजलं… मीच रुग्ण अन् मीच डॉक्टर अशी अवस्था होती… क्षणभर मी घाबरलो… पुढच्या क्षणी काहीही होऊ शकते… असेन मी नसेन मी… काय होणार…? माझ्या कंपाऊंडरने मुखेडमधीलच फिजीशियन व ह्रदयरोग तज्ञ डॉ. अशोक कौरवार यांना बोलावून घेतले… इतरही डॉक्टर त्यावेळी धावून आले… त्यावेळी मला ‘टिनॅकटॅप्लेज’ हे ह्रदयातील रक्ताची गुठळी पातळ होण्याचे इंजेक्शन द्यायचे ठरले… नांदेडच्या डॉक्टरांना संपर्क केला… मी डॉक्टरांना म्हणालो, की ते इंजेक्शन मला द्या… मी सोफ्यावर झोपलो… माझी पत्नी सौ.मालाने माझा हात धरला व कन्या भक्तीने डोकं… क्षणभर मी डोळे मिटून परमेश्वराचे नामस्मरण केले… तोपर्यंत मी अस्वस्थच होतो… मला माझी वेदना सांगताही येत नव्हती आणि सहनही होत नव्हती. रुग्ण मला ‘घबराट’ होते असे सांगतात – ती ‘घबराट’ मी प्रत्यक्ष अनुभवत होतो… डॉ. कौरवार यांनी धाडसानं ते इंजेक्शन मला दिलं… त्या इंजेक्शनमुळे 10 मिनिटातच माझी ‘घबराट’ कमी झाली… घरीच मॉनिटर लावण्यात आले होते… त्या मॉनिटर वरील हृदयविकाराची लक्षणे हळूहळू कमी होत असल्याचे दिसत होते… मला माझे कुटुंब, इतर डॉक्टर व मित्रपरिवारसह नांदेडच्या आश्विनी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. दुसर्या गाडीत माझ्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेला सर्पदंशाचा रुग्ण शरद इंगोले यालाही माझ्यासोबतच आश्विनी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. डॉ. किशोर पबितवार, डॉ. मुकुंद जोशी, डॉ. लटुरिया, डॉ रवी बिलोलीकर डॉ. गजानन चौधरी, डॉ. मदनूरकर व त्यांच्या सर्व टीमने माझ्यावर तातडीचे उपचार केले…
डॉ. मान्नीकर, डॉ. वट्टमवार ,डॉ. बिलोलीकर व श्री. रमेश मेगदे, रेवणवार अन् सर्व लवाजम्यासह मला औरंगाबादच्या कमलनयन बजाज हॉस्पिटल मध्ये स्थलांतरित करण्यात आले. संध्याकाळी सहा वाजता माझे मित्र सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अजित भागवत यांनी माझी Angioplasty यशस्वीपणे केली… तोपर्यंत नांदेड-मुखेड भागात अशी अफवा पसरली की, डॉ. पुंडे यांचे निधन झाले… माझे सुप्रभात मित्रमंडळाचे मित्र कै. अनिल कोत्तावार व इतर सदस्य, माझी पत्नी, कन्या, सासुरवाडी पुसद येथील क्षीरसागर परिवार, भावंडे, पुंंडे हॉस्पिटलचे कर्मचारी इतर नातेवाईक माझ्यासोबत होते.. .माझा मुलगा डाॅ. गौरव आणि भाच्चा डाॅ. संदीप गोरे हे पुणे आणि मुंबई येथून धावत आले. माझा वर्गमित्र डाॅ सुनील सिरसीकर सतत भेटत असे. पद्मश्री डाॅ.बावसकर, माझे मधुमेहाचे डॉक्टर – डाॅ.संतोष मालपाणी, श्री. संजीवजी कुलकर्णी आदि मिञ सतत संपर्कात होते. इतर अनेक जण चिंतेत होते. मग मी यातून हळूहळू ठणठणीत बरा झालो… दरम्यानच्या काळात अनेक लोकांनी गावागावात माझ्या आरोग्यासाठी अनेक मंदिरा़ंत अभिषेक केले, मशिदीत माझ्यासाठी दुवा मागितली. मंदिरा़ंत माझ्यासाठी घंटानाद झाले… हे सगळं मला परत आल्यावर समजले… आमच्या भागातील नेते मा.आ. किसनराव राठोड व आमदार कै. गोविंदराव राठोड यांनी तर माझ्यासाठी देव पाण्यात ठेवले होते… नवस केलेल्यांनी मी परत आल्यावर नवसांची परतफेड केली… परत मुखेडमध्ये यायला रात्रीचे 11 वाजले होते… तरीही जवळपास 500 लोक माझ्या स्वागतासाठी त्यावेळीही हजर होते… नंतर अनेक दिवस हजारो लोक भेटण्यास आले. हे सर्व पाहून मी भारावलो… शब्द न फुटता निःशब्द झालो… हे माझ्या 25 वर्षांच्या सेवेचं फलित होतं… हे प्रेम पाहून मला याची जाणीव झाली की, दवा के साथ दुवा भी काम आती है… हा सर्व प्रकार माझं मन हेलावून टाकणारा व माझ्या पुढच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरला… हा माझा हृदयरोग मला बरेच काही शिकवून गेला…
आपुले मरण पाहिले मी डोळा
जाहला सोहळा अनुपम…
अन् लोकांनी माझ्या आजाराचा सोहळा केला… माझ्या जांब व मुखेडवासियांंनी तर उत्सवच साजरा केला.
सततच्या तणावामुळे मला झालेला मधुमेह आणि त्यातून आलेला हा हृदयविकाराचा झटका अन् यातून झालेला माझा पुनर्जन्म… हे सर्व पाहून मला अनेक लोकांनी सल्ला दिला की, डॉक्टर आता तुम्ही काम करु नका… आराम करा… पण मी असं ठरवलं की मला आता सर्पदंशाबरोबरच हृदयरोगावरही काम करायचंय… मी 2-3 ठिकाणी जाऊन त्याचे प्रशिक्षण घेतले. माझ्या हॉस्पिटलमध्ये अनेक बदल करून घेतले… एक चांगले ICU Unit तयार करून घेतले… आजपर्यंत शेकडो हृदयरोगाच्या रुग्णांवर उपचार करून हृदय बंद पडलेल्या अनेक रुग्णांना शॉक देऊन त्यांना नवजीवन देऊ शकलो… हे रुग्ण भेटतात… कृतज्ञता व्यक्त करतात… याचा मला भरभरुन आंनद होतो.
या हृदयविकारानं मला संकटाची शिडी करायला शिकवलं आणि आपल्याला किती जणांच्या हृदयांत जागा आहे याचं दर्शनही घडवलं… ग्रामीण भागातील जनता डॉक्टरवर किती प्रेम करते या कार्याची ती पावतीच होती…
अहोरात्र वैद्यकीय सेवा देत असताना अनेेक डाॅक्टरांचे स्वतः कडे दुर्लक्ष होते .सततचा तणाव, अनियमित आहार, व्यसने, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, स्पर्धा आणि बदलती सामाजिक परिस्थिती यामुळे भारतीय डाॅक्टरांमध्ये मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, नैराश्य आत्महत्या, घटते आयुर्मान आदि आजारांचे प्रमाण हे सामान्य जनतेपेक्षा जास्त आहे. सात राज्यातील डाॅक्टर्स vs सर्वसामान्य जनता यांच्यातील एक वर्षाचा अभ्यास आणि सर्वेक्षणाअंती हा अहवाल National Medical Journalof India,January 2008 मध्ये प्रकाशित करण्यात आला व भारतीय डाॅक्टरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. Doctor is a burning Candle from both ends. From upper end he/she burns for the society and from lower end he/she burns himself/herself. माझी अवस्थाही असीच. माझा हृदयरोग माझ्यासाठी साक्षात्कारीच ठरला… स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न चालू आहे. मिञमंडळ उभारी देत असते. मी नेहमीच म्हणत असतो. डाॅक्टरांच्या गोळ्या खावून जगण्यापेक्षा मिञांच्या टोळ्यात राहून जगा, कारण दवांमें कोई खुशी नही और खुशी जैसी दवा नही ।।
आम्हीच आम्हा परतून पहावे
काढून चष्मा डोळ्यावरचा।।
म्हणतात ना, रक्ताचं नातं दाट असतं पण अश्रूंचं नातं घनदाट… अश्रूंच्या नात्यांनी मी दिवसेंदिवस अधिकाधिक श्रीमंत होत आहे… माझ्यासाठी प्रार्थना करणारे हात आणि अश्रू ढाळणारे डोळे ही माझी आजपर्यंतची कमाई… हे ऋण फेडणे शक्य नाही तेंव्हा मी सदैव सर्वांच्या ऋणात राहील. माझी रुग्ण आणि इतरांशी जुळलेली घट्ट नाळ शेवटपर्यंत टिकवून ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे…
पुर्नजन्म असतो नसतो मला माहीत नाही पण असलाच तर मला पुन्हा डॉक्टर करून अशा रुग्णांची सेवा करण्याची संधी द्यावी हेचि अनंताशी मागणे…
डॉ. दिलीप पुंडे
सदस्य, सर्पदंश तज्ज्ञ समिती,
जागतिक आरोग्य संघटना (WHO)
पुंडे हॉस्पिटल, मुखेड जि. नांदेड
ईमेल : drpundedp@gmail.com