
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
गोंधनापुर (खामगाव) दि.२५.’लश्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या संपर्कामध्ये असलेल्या पुण्यातील एकाला दहशतवादविरोधी पथकाने दापोडीतून अटक केली. त्याने शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा खरेदी करण्यासाठी फंडिंग केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.त्याशिवाय त्याने महाराष्ट्रात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी रेकी केली असून, मागील दोन वर्षांत तो सहा वेळा जम्मू-कश्मीरमध्ये गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो दहशतवाद्यांच्या संपर्कात आल्याचे उघडकीस आले आहे. न्यायालयाने त्याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
मोहम्मद जुनैद मोहम्मद (२३, रा. दापोडी, मूळ रा. गोंधनापूर, खामगाव, बुलढाणा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो २०२१ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात आला होता.
मोहम्मद जुनैद हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधील रहिवासी असून, गेल्या दीड वर्षापासून तो पुण्यात भाडेकरू म्हणून राहत होता. काही काळ त्याने मदरशांमध्ये आश्रय घेतला होता. दहशतवाद्यांनी २०२१ मध्ये त्याला कश्मीरमध्ये नेऊन ब्रेनवॉश केला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्याला फंडिंग गोळा करण्याचे काम देण्यात आले. त्या पैशांच्या माध्यमातून शस्त्रे आणि दारूगोळा घेण्यात येणार होता. जुनैदने राज्यातील विविध भागांत रेकी केली असून, त्याने नेमकी कोणकोणत्या ठिकाणांची रेकी केली आहे, याबाबत ‘एटीएस’ पथकाकडून तपास करण्यात येणार आहे. यापूर्वी देशभरात झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये पुणे दहशतवाद्यांचे कनेक्शन असल्याचेही उघडकीस आले आहे.
‘इंडियन मुजाहिदीन’ संघटनेकडून देशातील काही भागांत बॉम्ब स्फोट घडविण्यात आले होते. याप्रकरणी पुण्यातील कोंढव्यात राहणाऱ्या मोहसीन चौधरीचा हात असल्याचे उघडकीस आले होते. त्याचा ठाकठिकाणा अद्यापि लागलेला नाही. दरम्यान, बॉम्ब स्फोट कटासह इतर कारवायांसाठी पुण्यातील कोंढव्यात एक केंद्र चालविण्यात येत असल्याचे उघडकीस आले होते. त्यावेळी दहशतवादी कारवायांमध्ये पुण्यातील काही जण गुंतल्याचे निष्पन्न झाले होते. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेने पुण्यातील तरुणीला अटक केली होती. संबंधित तरुणी दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले होते. जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट, जंगली महाराज रस्ता आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या आकारातील बॉम्ब स्फोट दहशतवाद्यांनी घडवून आणले होते.
मोहम्मद हा इतर राज्यांतील आणखी काही जणांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे. त्याअनुषंगाने त्याच्याकडे तपास करण्यासाठी मोहम्मद हा इतरांशी संपर्क साधण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करत होता? त्याने देशातील धर्मस्थळे, संरक्षण दलांसह इतर महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने कोणकोणत्या ठिकाणांची रेकी केली आहे? या ठिकाणी कोणत्या कारवाया करण्याचा त्याचा हेतू होता? त्याने शस्त्र चालविण्याचे किंवा दारूगोळा वापरण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा संशय आहे. त्याबाबत तपास करण्यासाठी तसेच त्याच्याकडून इतर कोणी प्रशिक्षण घेत आहे का? किंवा कोणी प्रशिक्षण पूर्ण केले आहे का, याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली. तर बचाव पक्षातर्फे ऍड. यशपाल पुरोहित यांनी बाजू मांडली.
फेसबुक, व्हॉट्सऍपद्वारे दहशतवाद्यांशी संपर्क
सोशल मीडियाचा गैरवापर करून मोहम्मद जुनैद दहशतवाद्यांसोबत संपर्क साधत होता. फेसबुक आणि व्हॉट्सऍप ग्रुपद्वारे चॅटिंग केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ‘एटीएस’ पथकाने त्याच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवून ताब्यात घेतले. त्यावेळी तो मागील दोन वर्षांत सहा वेळा कश्मीरला जाऊन आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाला माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तो देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले.