
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश नामदेव माने
जालना, दि. 17 (जिमाका) : – खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रातून योग्य दरात बियाणे व रासायनिक खते उपलब्ध करुन दिले जातात का, याची प्रत्यक्ष शहानिशा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी काल जालना तालुक्यातील मौ. मानेगाव येथील शुभम फर्टिलायझर या कृषी सेवा केंद्रास अचानक भेट देऊन तपासणी केली.
बियाणे व रासायनिक खते याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना संपर्क साधावा, असे आवाहन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, शेतकऱ्यांनी बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना बियाणे पाकिटे / खताच्या गोणीवरील किरकोळ कमाल विक्री किंमत पाहूनच खरेदी करावी. कृषी सेवा केंद्र चालकांनी योग्य दरात शेतकऱ्यांना बियाणे व खते उपलब्ध करुन दयावीत. जादा दराने, रासायनिक खताबरोबर इतर विद्राव्य खते देण्याचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाही. शेतकऱ्यांनी विक्रेत्यांकडून खरेदीची पक्की पावती घ्यावी. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना बियाणे व रासायकि खते इत्यादी कृषी निविष्ठा चांगल्या प्रतीच्या व योग्य दरात उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना यावेळी दिले.