
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
वारकरी सांप्रदायात महत्वाच्या असणाऱ्या आषाढी एकादशी निमित्ताने संताची भूमी असलेले शिऊरगाव विठ्ठलमय झाले.शिऊर गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती.
श्री संत शंकरस्वामी महाराज यांनी स्थापित केलेल्या शिऊर येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर व श्री संत शंकरस्वामी महाराज समाधी मंदिर येथे संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, शिऊर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सरपंच राजश्री जाधव, शिवाजी जाधव यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत सामुदायिक महापूजा संपन्न झाली .
शिऊर गावातील संत बहिणाबाई, संत शिवाई , संत तुकाराम महाराज मंदिरासह विविध मंदिरात दर्शनासाठी दिवसभर भाविकांची रीघ लागली होती.
महापूजेवेळी माजी सरपंच , संस्थानचे सचिव बबनराव जाधव, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष भास्कर जाधव, पंकज देशमुख, शिरीष चव्हाण, सुनील देशमुख, मंगेश जाधव, अनिल चव्हाण, वाल्मिक सोनवणे, रवींद्र देशमुख, दिलीप नाजीरे, पवन पाठक, दीपक गाजरे, स्वामी वंशज बंडोपंत लाखे, प्रकाश लाखे, रमेश लाखे आदी उपस्थित होते.
पांडुरंगाला साकडे
यंदा राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊ दे. राज्यातला बळीराजा सुखी होऊ दे. त्याच्या शेतशिवारात, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊ दे. बा पांडुरंगा, सर्वांना निरोगी, सुखी, समाधानी, आनंदी ठेव” असे साकडे संस्थान अध्यक्ष एकनाथराव जाधव यांनी पांडुरंगाला घातले.
मोठा पोलीस बंदोबस्त
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर सर्व निर्बंध हटवले गेल्याने संतभूमी शिऊर येथील सर्वच मंदिरात प्रथमच मोठी गर्दी झाली होती, रविवार आठवडी बाजार असल्याने पूर्ण गावात गर्दी दिसून आली, मंदिरात भाविकांनी शिस्तीत दर्शन घेतले दरम्यान शिऊर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
समाधी मंदिरात आकर्षक सजावट, रांगोळीनेही वेधले लक्ष
आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री संत शंकरस्वामी महाराज , संत नारायणस्वामी महाराज यांच्या समाधीवर फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती, समाधीवरील फुलांच्या सजावटीने व सायली लाखे तसेच घोडके दांपत्यानी रेखाटलेल्या रांगोळीने सर्वाचेच लक्ष वेधले.
नाशिक वरून विशेष पोशाख
आषाढी एकादशी निमित्ताने पांडुरंग-रुख्मिनी यांच्या मूर्तीसाठी डॉ. अशोकराव लाखे यांच्या वतीने विशेष पोशाख आणण्यात आला, रुख्मिनी मातेला साज शृंगार, भरजरी दागिने तर विठ्ठलाच्या मूर्तीला मोठा फेटा बांधण्यात आला, या मूर्तींना विशेष पोशाख परिधान करण्यासाठी तब्बल दीड तास लागल्याचे स्वामींचे वंशज बंडोपंत महाराज लाखेस्वामी यांनी सांगितले.
सप्ताह निमित्ताने ध्वजपुजन
श्री संत शंकरस्वामी महाराज संस्थान फडाचा २७७ वा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी श्री क्षेत्र शिऊर येथे दिनांक २ ते ९ ऑगस्ट दरम्यान व्यापक प्रमाणात होणार आहे, या सप्ताहाचे ध्वजपुजन देखील मोठ्या उत्साहात पार पडले.
चित्रकलेने पांडुरंगाची आराधना
शिऊर येथील शिक्षक प्रवीण गवळी यांनी आपल्या चित्रकलेने पांडुरंगाचे चित्र रेखाटले,तसेच वारकरी दिंडीचे हुबेहूब चित्र रेखाटल्याने त्यांच्या कलेचे सोशलमीडियावर दिवसभर कौतुक सुरू होते.
अनेक दिंड्या शिऊर मध्ये
संतभुमी असलेल्या शिऊर गावाला विशेष महत्व आहे, आषाढी एकादशीचे औचित्य साधत अनेक दिंड्या हरिनामाचा जयघोष करत शिऊर येथे दाखल झाल्या होत्या.
स.पो.नि पाटील यांचा सत्कार
शिऊर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे महापूजेसाठी सपत्नीक उपस्थित होते, त्यांच्या हस्ते दोन्हीही मंदिरात महापूजा झाली संस्थानच्या वतीने अध्यक्ष एकनाथराव जाधव यांच्या हस्ते सपोनि पाटील यांचा सत्कार करण्यात आला.