
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी टेंडर स्माईल प्री स्कूल मध्ये आषाढी एकादशी हा सण मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व मुले आणि पालक या उत्सवात सहभागी होते.
आषाढी साजरी करताना सर्व मुले व मुली हे विठ्ठल, रुक्मिणी आणि वारकरी यांच्या पोशाखात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आषाढी एकादशीचे महत्त्व मुलांना मातीच्या तसेच कापडाच्या बाहुल्यांच्या मार्फत सांगण्यात आले. अतिशय सुंदर देखावा उभा करून शिक्षकांनी दिंडीतील पात्रांची ओळख करून दिली. त्यामुळे मुलांना एकादशी का साजरी करतात आणि त्याचे महत्त्व समजले. त्यानंतर सर्व मुले आणि पालक यांची दिंडी शाळेच्या जवळच असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नेण्यात आली. त्यामध्ये चिमुकली मुले पायी आणि पावसामध्ये चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेली.
तर दिंडीतील पालकांनी फेर धरून, पावली खेळून, फुगडी घालून विठ्ठलाला साकडे घातले आणि पायी दिंडीचा आनंद देखील घेतला.
लहानग्यांनी मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन तर घेतलेच शिवाय मंदिरामध्ये देखील गोल रिंगणात सर्वांनी पावली खेळली आणि सर्व परिसरात “जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल” चा जयघोष पसरवला.
परिसरातील नागरिकांनी आणि पालकांनी उत्साहाने या दिंडीमध्ये आपल्या सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षिका, प्रिन्सिपल श्वेता गिरी आणि शाळेचे संचालक रोहित गिरी यांनी परिश्रम घेतले. तसेच पालकांनी उत्स्फूर्तरीत्या सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.