दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : नातेसंबंधातील कटुता-दुरावा, कौटुंबिक कलह अन् ब्रेकअप… अशा विविध कारणांमुळे १८ ते ५० वयोगटांतील महिला-तरुणींमध्ये नकारात्मक भावना निर्माण होत आहे. हा दुरावा आता ‘सोशल चव्हाट्यावर’ येऊ लागला आहे. आपली ही वेदना मांडण्यासाठी महिला-तरुणी आता सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. महिलांशी निगडित फेसबुकवरील विविध ग्रुप, वैयक्तिक अकाउंटवर पोस्टद्वारे म्हणणे मांडले जात असून, त्यांच्यासारख्या कित्येक महिला-तरुणी त्यांच्या पोस्ट वाचून त्यांना सकारात्मक मार्ग दाखविण्याचे काम करत आहेत.
सध्या कौटुंबिक हिंसाचार, व्यसनाधीनता, ब्रेकअप, नोकरीतील दुय्यम स्थान, व्यवसायातील अपयश… अशा विविध कारणांमुळेही महिला-तरुणींमध्ये नकारात्मक भावना वाढत आहेत. खासकरून नातेसंबंधातील कटुतेमुळे आणि दुराव्यामुळे तर त्यांच्या मनात आत्महत्येचेही विचारही येत आहेत. ते मित्र-मैत्रिणींबरोबर आणि आप्तेष्टांबद्दल याविषयी बोलतात; पण आता सोशल मीडियावरही त्रासाबद्दल बोलत आहेत. आपल्या सोबत घडलेली घटना सांगत आहेत. तरूणी व महिलांना यामुळे दिलासा मिळतोय.
