
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- कवि सरकार इंगळी
मराठी बालकुमार साहित्य सभेचा वर्धापन दिन *भाई माधवराव बागल प्रशाला कसबा बावडा* येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात बाल साहित्यिक साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून झाली. ‘करील मनोरंजन जो मुलांचे | जमेल नाते प्रभुशी तयाचे ||’ या ब्रीद वाक्याप्रमाणे कार्य करणारी ही संस्था. या संस्थेने तीन वर्षे पूर्ण तीस वर्षे पूर्ण करून 31 व्या वर्षात पदार्पण केले आहे या संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यात आहे सांगली बेळगाव रायगड इत्यादी जिल्ह्यातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. असे उद्गार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत निकाडेसर यांनी काढले.
स्वागतम, स्वागतम या गीतातून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता नवाळे मॅडम यांनी करून दिली.
शाळेतील विद्यार्थिनी अंकिता गाढवे हिने *संदेश* ही कविता सादर केली. प्रथमेश आकुर्डे या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. सभेचे कार्यवाह श्री. परशराम आंबी यांनी ‘आजीशिवाय….’ आणि ‘आठवणीचा खजिना’ या कवितांचे सादरीकरण केले. संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. नसीम जमादार यांनी ‘श्रावण’ ही कविता सादर करताना श्रावणातील येणारे सण आणि त्यांची वैशिष्ट्य अतिशय सूत्रबद्धपणे वर्णन केले. संस्थेचे सदस्य श्री. रवींद्र खैरे यांनी मुलांनी कविता कशी लिहावी याचे मार्गदर्शन करून ‘शाळेच्या रस्त्यावरील बकुळीचे झाड’ ही कविता अतिशय भावपूर्ण आणि सूरबद्ध सादर केली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि बालकुमार साहित्य सभेचे अध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत निकाडेसर यांनी बालकुमार साहित्य सभेचा इतिहास, संस्थेचे कार्य, संस्थेची भरभराटी सांगून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारी ‘जत्रा’ या कथेचे कथाकथन सादर केले. सायंकाळचे साडेपाच वाजून गेले तरी मुलांच्यामध्ये असणारा उत्साह ओसंडून वाहत होता. वेळ खूप झाल्यामुळे शाळेत पुन्हा येऊन कथा व कविता लेखन कार्यशाळा घेण्याचे अभिवचन श्री. चंद्रकांत निकाडेसर यांनी दिले.
या कार्यक्रमाचे आभार गजानन सावंत यांनी मानले. तर काव्यात्मक सूत्रसंचालन सौ. पद्मिनी माने यांनी केले.
या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, कर्मचारी वर्ग उपस्थित होता. विविध झाडांची रोपे देऊन सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.