
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
नांदुरा: दि.१४.बुद्ध धम्मात वर्षवासाला फार ऐतिहासिक महत्त्व आहे.
गुरु पौर्णिमा पासून ( वर्षावास प्रारंभ ) होतो.
ह्या जगात अनेक गुरु होऊन गेले त्यापैकी एक ते म्हणजे संपूर्ण विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध होय .
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले …तथागत गौतम बुद्ध जे बोलले त्यांनी तसे केले म्हणून ते तथागत आहेत.
बौद्ध धम्मात पौर्णिमेला फार महत्व आहे कारण भगवान बुद्धांच्या जीवनात ज्या ज्या मंगल घटना घडल्या त्या पौर्णिमेलाच घडल्या आहेत .त्यांच्या जीवनात पहिली पौर्णिमा आली ती म्हणजे आषाढ पौर्णिमा होय . या पौर्णिमेचे पहिले महत्व म्हणेज ह्या पौर्णिमेला शाक्य लोकात पौर्णिमेच्या सात दिवस आधी एक उत्सव साजरा करीत असत . इ . स. पूर्व ५६३ ला कपिलवस्तूचे राज्यपद राजा शुद्धोधन याच्याकडे होते . राजा शुद्धोधन हा खूप श्रीमंत राजा होता त्याच्याकडे अनेक राजवाडे .महाल ,
नोकर चाकर होते. त्याप्रमाणे हजारो एकर जमीन होती. तेथील रीवाजाप्रमाणे राजा शुद्धोधन हा शेतीत जाऊन मजुरांसोबत काम करीत असे. राजा शुद्धोधन व माता महामाया यांना बरेच वर्षे मुलबाळ नव्हते आणि हीच उणीव त्यांच्या जीवनात होती. परंतु ह्या पौर्णिमेच्या दिवशी राजा शुद्धोधन व माता महामाया यांच्या सहवास घडला आणि माता महामायेला गरोदर असल्याचे समजले आणि म्हणून या पौर्णिमेला गर्भमंगल दिन असेही म्हणतात.
आषाढ पौर्णिमेचे दुसरे महत्व असे कि सिद्धार्थ गौतम जेव्हा मोठे झाले तेव्हा शाक्य आणि कोलिय यांच्या राज्यामध्ये रोहिणी नावाची नदी वाहत असे त्या नदीचे पाणी ते शेतीकरिता वापरात असत . आणि हे पाणी आधी कोणी घ्यावे , किती घ्यावे यावरून त्यांचे नेहमी भांडण होत असे. त्या वर्षी देखील असेच वाद झाला कि नदीचे पाणी आधी कोणी घ्यावे व हे भांडण अगदी टोकाला पोहचले . आणि शाक्य संघातील लोकांनी कोलीयांविरुद्ध युद्ध करण्याचे ठरविले . तसा ठराव त्यांनी संघात मांडला परंतु सिद्धार्थाने मात्र ह्या ठरावास विरोध केला आणि ते म्हणाले कि आपण युद्ध न करता शांततेत वाटाघाटीने ह्यातून मार्ग काढू .
परंतु संघाचा असा नियम होता कि जो संघाच्या विरुद्ध बोलेल त्याला शिक्षा देण्यात येईल . असा त्यंचा नियम होता. आणि सिद्धार्थाना देखील शिक्षा म्हणून गृहत्याग करावा लागला . जगातील विविध समस्या व समस्त दुःखाच्या कारणाचे मुळ कारण शोधण्यासाठी सिद्धार्थाने गृहत्याग केला .
संपूर्ण राजवैभव, संपत्ती आणि सुंदर देखणी पत्नी यशोधरा एकुलता एक लाडका मुलगा राहुल त्याचप्रमाणे माता पिता यांचा त्याग करावा लागला . सर्व मित्र परिवार आप्तेष्टांचा त्याग करावा लागला . सिद्धार्थ गौतमांचा गृहत्याग म्हणजे पलायन नव्हे, तर जगाच्या कल्याणासाठी केलेला तो गृह त्याग होय .त्यांनी सगळ्यांसमोर भारद्वाज ऋषींच्या आश्रमात जाऊन प्रवज्जा घेतली . व डोक्यावरील केस काढले , काषाय ( केसरी वस्त्र )वस्त्र परिधान करून हातात भिक्षापात्र घेउन ते निघाले . त्या दिवशी देखील आषाढ पौर्णिमा होती ह्या दिवसाला’ महाभिनिष्क्रमण ‘ दिन असे म्हणतात .
तिसरे महत्व असे कि गृहत्याग केल्यानंतर अनेक ऋषींच्या आश्रमांत जाऊन ज्ञान संपादन केल्यानंतर इ. स. पूर्व ५२८ ला त्यांना गया येथे पिंपळाच्या झाडाखाली दिव्या ज्ञान दृष्टी प्राप्त झाली . म्हणजेच सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले . ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांनी हे ज्ञान पाच परिव्राजक यांना दिले त्यांची नावे कौंडिण्य, वप्प , भद्दीय, अश्वजीत ,महानाम अशी आहेत . यांना प्रथम धम्म उपदेश केला .
त्यानंतर तथागतांनी वर्षावास प्रारंभ केला . आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा हा काळ वर्षे वास म्हणून तेव्हापासून संपन्न होऊ लागला . वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील निवास , वर्षावास प्रारंभ करण्याचे कारण असे कि पावसाळ्याच्या तीन ( ३ ) महिने भिक्षुंना पावसापासून त्रास होऊ नये म्हणजे त्यांचे चीवर भिजू नये ,आणि त्यांना जंगली हिंसक , विषारी प्राण्यांपासून इजा होऊ नये त्याकरिता त्यांनी स्थानिक विहारात अथवा स्तूपात राहून तेथील उपासक उपसिकांना धम्माचा उपदेश करावा . भगवान बुद्धांनी आपला प्रथम वर्षावास सारनाथ येथे केला आहे. त्यांनी त्यांच्या जीवनात वैशाली ,राजगृह, जालिया पर्वत, श्रावस्ती , कपिल वस्तू ,जेतवन अशा अनेक ठिकाणी वर्षावास केले . त्यांनी आपल्या सोबत असलेल्या भिक्षु संघाला संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी जो जो धम्म उपदेश दिला त्यालाच वर्षवास असे म्हणतात ह्या वर्षावास कालखंडात बौद्ध उपासक / उपसिकांनी उपोसथ धारण करावे .( उपोसथ म्हणजे स्वतःजवळ राहणे ) आणि अष्टशील ग्रहण करणे त्याचबरोबर आपल्या गावातील नगरातील बुद्ध विहारात जाऊन प्रवचने ऐकावीत व बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे वाचन संत महापुरुषांच्या जीवन कार्यावर व्याख्याने , प्रवचन आयोजित करावी करावे .व पुण्य कर्म संपादन करावे . अशा प्रकारे बौद्ध उपासकांनी वर्षावास साजरा करावा .
सर्व बौद्ध उपासक/ उपसिकांना आषाढ पौर्णिमेच्या व वर्षावासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा …
सिद्धार्थ अशोक तायडे
मु .पो. वडनेर भोलजी
ता. नांदुरा जि. बुलडाणा