
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी – दत्तात्रय वा. कराळे
एका बाजूला संततधार पावसामुळे अगोदरच जनता परेशान तर दुसरीकडे वारंवार होणाऱ्या बत्ती गुलमुळे अंध:कारमय वातावरणात जीवन जगणे अशक्यप्राय होऊन बसले आहे. कालपासून डीपी जळल्यामुळे प्रियदर्शनी नगरातील जनता मात्र पूर्णपणे अंधारात चाचपडत जीवन जगत आहे. कारण काहीही असो, तो महावितरण प्रशासनाचा लुक आऊट असला तरी त्याची झळ मात्र करदात्यांना नागरिकांनाच बसल्याशिवाय राहात नाही.
सकाळी सात वाजता अचानक वीज बंद झाल्याने नागरिकांमध्ये कमालीचा गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे स्थानिक समाजसेवक सुरेश काळे यांनी घराबाहेर येऊन सदर गोंधळाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता जे कारण समजले ते ऐकून नक्कीच मनस्वी धक्का देणारेच वाटले. सकाळची वेळ… लहान-मोठ्या मुलांना शाळेत जायची घाई…हातावर पोट असलेल्या गरीब, कामगार, कष्टक-यांना कामावर जायची वेळ होती. वीज गायब झाल्याने शाळेत जाणा-या मुलांना आंघोळीसाठी लागणारे गरम पाणी मिळणे बंद झाले. मोठ्या माणसांना कामावर जायचं पण त्यामुळे नास्ता व जेवणाचा डब्बा मिळणे दूरापास्त झाले होते अगदी घाई-गडबडीचीच वेळ होती ती…..आणि म्हणून परिसरात एकच गलका उठला होता.
समाजसेवक सुरेश काळे यांनी झालेली ही गैरसोय बघून लाईनमनला फोन लावला व सर्व लाईट गेल्याचे सांगितले. लाईनमन ही आले, डीपी वर तपासणी केली असता दोन डिव उडाले व एक पट्टी ही तुटल्याचे समजले. लाईनमन आले, काम करुन गेलेही पण लाईन काही दुरुस्त झाली नाही तरीही दुरुस्त झाल्याचे सांगून नेहमीप्रमाणे ते निघून गेले. अर्थात हे काही नवीन नव्हते परंतु ये रे माझ्या मागल्या… काळे यांनी पुन्हा फोन लावून दुसरे लाईन मनला बोलावून घेतले असता त्यानी मात्र दुरुस्त केलेला तो डीपी जळल्याचे सांगितले. एका बाजूला लाईट नसल्याने लोकांची तारांबळ तर दुसर्या बाजूला वीज कर्मचा-यांच्या कामाची विसंगती पाहून आश्चर्य वाटले. उद्या दुरुस्त करु किंवा दुसरा डीपी टाकू म्हणून ते निघूनही गेले परंतु समस्या मात्र जैसे थे च राहिली. जेव्हा कधी समस्येचं निरसन होईल ते होवो परंतु संततधार पाऊस आणि विजेचा लपंडाव ह्या बाबी काही नवीन नसून जनतेच्या पाचवीलाच पूजलेल्या आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरु नये. मात्र समाजसेवक सुरेश काळे व प्रियदर्शनी नगरासह अन्य भागालाही हे सारं संकटाचं जाळं नित्य नियमाचं झालं आहे एवढं खरं !