
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरात ठिकठिकाणी रस्त्यांचे खस्ता हाल झाल्यामुळे नागरिकांना रहदारी करणे दूरापास्त झाले आहे. अगदी घोट्यापर्यत घाणीच्या चिखलातून वाचलेल्या पाण्यातून नाईलाजाने प्रवास करावा लागतो आहे. त्याचाच परिपाक म्हणून वांगी रोड, साईबाबा नगर, सय्यद कॉर्नर आणि अहिल्याबाई होळकर नगरातील असंख्य नागरिक चिखलमुक्त रस्त्याच्या मागणीसाठी झुंडीच्या झुंडीने बाहेर पडतांना दिसत आहेत. अत्यंत चिंतेची बाब म्हणजे वसमत रोडवरील विश्वनाथ नगरात तलावरुपी साचलेले पावसाचे पाणी प्रत्येकाच्या घरात घुसून जलमय स्थिती झाल्याचे दिसत आहे.
शहरातील जुना खारेगाव रोड ते उघडा महादेव मंदीर दरम्यानच्या रस्त्यावर खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे म्हणून समाजसेवक विशाल बुधवंत यांनी रस्त्यावर झोपून ठिय्या आंदोलन छेडले असता महापालिका व जिल्हाधिकारी यांनी तत्परतेने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला परंतु शहरातील अन्य रस्त्यांच्या बाबतीत मात्र तशी तत्परता का दाखविली नाही, असा सवाल संतप्त नागरिकांनी विचारल्यास नवल वाटू नये. वसमत रोड आणि शिवाजी महाराज चौकाकडे जाणारा रस्ता सोडला तर बहुतांश रस्ते दैन्यावस्था स्थितीमध्येच आहेत हे खेदाने म्हणावेसे वाटते. अपवाद म्हणून रजिस्ट्री ऑफीसकडे जाणारा रस्ता नुकताच कांहीं दिवसांपूर्वीच वरकरणी असाच सुधारण्यात आला आहे. जुने आरटीओ कार्यालयापासून कारेगाव कडे जाणारा एकमेव रस्ता दुहेरी मार्ग करणे आवश्यक असतांना तो अद्याप एकेरी स्वरुपातही रहदारी करण्यायोग्य नाही. त्यासाठी सुध्दा संबंधित नागरिकांनी संततधार पावसामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच तीव्र आंदोलन छेडले होते तरीही त्यासाठी मनपा किंवा जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी कोणताही पुढाकार घेतला नाही. ही सापत्न भावाची वागणूक संदेहास्पद अशीच वाटणे स्वाभाविक आहे, असं जनता बोलत आहे.