
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””’
परभणी : परभणी जिल्हा शिवसेनेचे माजी खासदार सुरेश जाधव हे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनुसार समजते आहे.
सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडलेले व त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदांची धुरा सांभाळणारे जाधव हे नुकतेच राष्ट्रवादी सूक्त झाले आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे सोपवल्याचे म्हणाले आहेत.
राज्यात झालेले सत्तांतर आणि राष्ट्रवादीमध्ये होत असलेली घुसमट असहाय्य न झाल्यानेच हा निर्णय घेतला असावा असे बोलले जात आहे. श्री. जाधव त्यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून त्यांच्या समर्थनार्थ चर्चा झाल्याचेही समजते. एक तळागाळातील कार्यकर्ता आपल्या सरकारचे पर्यायाने राज्याचं नेतृत्व करीत असेल तर नक्कीच सहकार्य करुन त्यांचे हात बळकट केले पाहिजेत असेही जाधव यांनी मुख्यमंत्री यांच्या बाबतीत केलेले विधान बरंच काही सांगून जाते स्वाभाविक आहे.
सुरेश जाधव हे लवकरच परभणी जिल्ह्याचा दौरा करणार असून ते आपले कार्यकर्ते जनतेशी संवाद साधणार आहेत. त्या सर्वांची मते जाणून घेत आपल्याला जनतेतून किती व कसा प्रतिसाद मिळू शकतो, हे समजल्यावर ते आपली पुढील भूमिका विषद करतील असे त्यांनी सांगितले. दरम्यान परभणी जिल्ह्यातील आजपर्यंतचा राजकीय इतिहास पहाता जाधव यांचे प्रयत्न सार्थकी ठरु शकतील का नाही, हे येणारा काळच दाखवून देऊ शकेल एवढे मात्र खरं आहे. कारण निवडून आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी शिवसेना पक्ष सोडला आहे, ते पुन्हा कोणीच निवडून आले नसल्याचे अनेक जणांचा कानोसा घेतला असता समजले.
दुसरीकडे पूर्णा पंचायत समितीचे माजी पदाधिकारी शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले आहे तर आणखी एका पदाधिकाऱ्यांने जय महाराष्ट्र करीत आज औरंगाबाद येथील जाहीर कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समर्थन जाहीर केले आहे. याचाच अर्थ आमदार-खासदारांच्या नियमित निवडीमुळे आतापर्यंत अभेद्य असलेला परभणीचा भगवा बालेकिल्ला एकेका पदाधिकाऱ्यांच्या गच्छंतीमुळे खिळखिळा होत चालला आहे, असं म्हटलं तर चुकीचं तर ठरणार नाही ना ? अशीही पाल चुकचुकल्या शिवाय राहातं नाही.