
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी-
औरंगाबाद : शिंदे गटाचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि खातेवाटपही मार्गी लागले. पण, बंडाच्या पहिल्या दिवसापासून सोबत असलेले औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना काही मंत्रिपद मिळाले नाही.
त्यामुळे शिरसाट यांनी आज पुन्हा एकदा ‘साला, आज सीनियरिटीचं कुठं काही राहिलंच नाही’ असं म्हणत नाराजी बोलून दाखवली. औरंगाबादमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना संजय शिरसाट यांनी भाजप मंत्र्यांसमोरच आपली नाराजी बोलून दाखवली.
अतुल सावे यांच्या वडिलांसोबत मी काम केलं होतं. त्यांच्या वडिलांसोबत काम करत असताना अतुल सावे हे राजकारणामध्ये येतील असं कधी वाटलं नव्हतं.
पण, राजकारणामध्ये आला काय, कॅबिनेटमंत्री झाला काय, सगळंच झालं आहे. अरे आमच्याकडे तरी पाहात जा. साला, आजकाल सीनियरिटीचं कुठं काही राहिलंच नाही’, असं म्हणत शिरसाट यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
आमदार संजय शिरसाट यांना मंत्री पद मिळाले नसल्याने त्यांची नाराजी ही अद्यापही कायम आहे.
संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा रंगली होती. मंत्रिमंडळामध्ये आपली वर्णी लागेल, यासाठी शिरसाट प्रयत्न करत होते. पण, मंत्रिमंडळाची यादी जाहीर झाली आणि शिरसाट यांचा पत्ता कापला गेला. औरंगाबाद जिल्ह्यातून भाजपचे नेते अतुल सावे, शिंदे गटातून संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळाले.
पण शिरसाट यांना मात्र मंत्रिपद मिळू शकले नाही. शिंदे सरकारकडून सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा विस्तार होणार आहे. त्यामध्ये आपल्याला सुद्धा मंत्रिपद मिळणार आहे, असं खुद्द शिरसाट यांनीच सांगितलेले आहे. त्यामुळे शिरसाट यांना दुसऱ्या मंत्रिमंडळात संधी मिळणार की नाही, हे पाहण्याचे ठरणार आहे.