
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध भक्तांना खूप आधीपासूनच लागलेले असतात.
गणपतीचं आगमन, त्याची पूजा, गणेशोत्सवाचा सोहळा आणि गणेश विसर्जन केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात नव्हे नव्हे संबंध जगभर यांची महती पसरली आहे. विदेशातही अगदी धुमधडाक्यात साजरे केले जाणारे गणेशोत्सव डोळ्याचं पारणं फेडणारे ठरले जातात. आगमनाच्या दिवशी प्रत्येकाला उत्साह असतो, आनंद गगनात मावेनासा होतो. चतुर्थीच्या दिवशी जितक्या उत्साहात व जल्लोषात बाप्पांचं आगमन होतं, तो उत्साह जेवढे दिवसाचा बाप्पाचा मुक्काम राहील, तेवढा पर्व काळ अगदी तसाच कायम राहिला जातो. गणेश चतुर्थीच्या आगमन काळात जशा उत्साहाने शुभेच्छा दिल्या जातात, तितक्याच भावनात्मकरित्या गणरायाला निरोपही दिला जातो. चला तर मग, या आपल्या लाडक्या बाप्पाविषयी पुराण काळात प्रचलित असलेली आणखी काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करुया….
मधुकैटंभाचा नाव करण्यासाठी नारायणाने गणेशाची उपासना केली होती. सृष्टीनिर्मात्या ब्रह्मादेवाच्या मनात एकदा असा अभिमान निर्माण झाला की, आपणच श्रेष्ठ आहोत. जेव्हा त्यांच्या समोर अनेक संकटं उभी राहिली, परिणामी त्यांचा जीव पूर्णा हैराण झाला होता, तेव्हा मात्र त्यांना श्री गणेशाचीच आराधना करावी लागली. प्रसन्न झालेल्या गणेशाने त्यांना इच्छित वर प्रदान करुन त्यांची सारी संकटं दूर केली. असाही उल्लेख आढळतो की, श्रीकृष्णाचं प्रेम संपादन करण्यासाठी राधेने सुध्दा गणेश पूजा केली होती.
गणपतीच्या प्रत्येक नावाच्या मागे काही ना काही रोमांचक घटना घडल्याचा उल्लेख आहे. ब्रह्म वैवर्त पुराणातली एक कथा प्रसिद्ध आहे. देवी पार्वतीने स्नानासाठी जाण्यापूर्वी शरिरावर तेल आणि सुगंधी उटणं लावलं होतं. स्नानाच्या वेळी निघालेला शरीरावरचा मळ मातीत मिसळून तिने पुतळा बनवला. तो पुतळा पाण्यात बुडणार संजीव झाला. पार्वतीने त्याला आपला मुलगा मानून घरी आणले. तो दिवस म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थी.
जेव्हा सिंधुरासुराने सा-या त्रिभुवनात हल्लकल्लोळ माजविला तेव्हा श्री गणेशाने गळा दाबून त्याला ठार केले. त्यांच्या शरीरातून निघालेल्या रक्ताने विजयाच्या आनंदात असणा-या गणेशाचं शरीर न्हाऊन निघालं. गणेशाचं रक्तवर्णांकित शरीर पाहून सा-या देवांनी ‘सिंधूवदन’ तथा ‘सिंदूरशोभन’ अशा नावाने स्तूती केली.
‘ऋध्दी’ तथा ‘सिध्दी’ किंवा ‘पुष्टी’ तथा ‘बुध्दी’ यांच्याबरोबर गणेशाचा मंगल विवाह झाला. म्हणून त्याला ‘सिध्दीदाता’, ‘विद्याबुध्दीदाता’ म्हणूनही ओळखलं जातं. त्यांच्या मुलांची नावं ‘शुभ’ आणि ‘लाभ’ (क्षेम) अशी आहेत. किंबहुना त्यासाठीच व्यापार करण्याच्या ठिकाणी भिंतीवर स्वस्तिक चिन्ह काढून त्याच्या दोन्ही बाजूला ऋध्दी-सिध्दी आणि शुभ-लाभ असे लिहितात. ज्योतिष आणि गणितात पारंगत असणा-या गणेशाला ‘शुभंकर’ म्हणूनही ओळखतात.
पारतंत्र्याच्या काळात जनतेचे विचार भ्रष्ट होत चालले, तरच पिढीवर इंग्रजांच्या आचार-विचारांचा प्रभाव वाढतो आहे, हे पाहून लोकमान्य टिळक बेचैन झाले. उत्सवप्रिय असणा-या तत्कालीन जनतेविषयी एका वेगळ्या उत्सवाबद्दल विचार करु लागले की, ज्या उत्सवामुळे समाजातले सारे वर्ग एकत्र येतील, या विचार मंथनातून त्यांना गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाची कल्पना सुचली.
समाज एकत्र कसा येऊ शकेल याबद्दल विचार झाला. या विचारांची फलश्रुती म्हणजे ‘सार्वजनिक गणेशोत्सव’. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसांचा काळ निश्चित करण्यात आला. पारतंत्र्याच्या काळात राष्ट्रोध्दार हा विशिष्ठ उद्देश नजरेसमोर ठेऊन गणेशोत्सवाचीनिर्मिती झाली. लोकमान्यांनापासून प्रेरणा घेऊन सर्व राजकीय कार्यकर्तही त्यात सहभागी झाले. सुरुवातीला धार्मिक उत्सव साज-या होणा-या गणेश उत्सवाला राष्ट्रीय स्वरुप प्राप्त झाले. या राष्ट्रीय उत्सवाच्या रे राष्ट्रीय एकता मंत्राचा प्रचार होईल, याचाही विचार लोकमान्यांनी केला होता. नवयुवकांमध्ये राष्ट्र प्रेमाची ज्यौत प्रज्वलीत होऊन राजनैतिक आंदोलनाच्या बळकटीने आणि एक धार्मिक उत्सव म्हणून इंग्रजांना त्यात हस्तक्षेप करण्यापूर्वी इंग्रज राज्यकर्त्यांना खूप विचार करावा लागला होता.
गणेशोत्सवामुळे राष्ट्रीयत्वाची भावना जनतेत जोपासण्याची जसं बळ मिळालं तसंच साहित्य आणि कलेला प्रोत्साहन मिळालं. उत्सवात होणारे सारे कार्यक्रम मराठी, हिंदी, याबरोबरच स्थानिक भाषेमध्ये होत असत. त्यामुळे भारतीय भाषांबद्दल जनमानसांत आदराची भावना निर्माण झाली. भारतीय भाषा सुध्दा विद्वानांची भाषा आहे, यांची लोकांना प्रचिती येऊ लागली. मेळाव्यासाठी अनेक कवींनी काव्य रचली. त्यातली वीररसातली काव्य अधिक लोकप्रिय झाली. रंग संघांची प्रगती झाली. गणेशोत्सवामुळे मराठी रं मंचांचं स्वरुप बदलू लागलं. नवीन नाटकांचं लिखाण व सादरीकरण होऊ लागलं. लोकसंगीत आणि लावणी प्रकाराकडे लोक आकर्षित होऊ लागले.
छोट्या गणेश मूर्तींबरोबर मूर्तीकार मोठ्या आकाराच्या असंख्य मूर्ती बनवून लागले. ज्यामुळे मूर्तीला आणि कलाकारांना संरक्षण मिळू लागले. अशा रितीने लोकमान्यांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवामुळे स्वरांच्या निर्मितीला बळ प्राप्त झाले. १९४७ मध्य भारत स्वतंत्र झाला. स्वराज्याचा सुराज्यात रुपांतर होण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी या गणेशोत्सवाची वाटचाल सुरु झाली. पण पुढच्या काळात मात्र तो रोषणाईच्या झगमगाट, वेगळ्या वाटेने चाललेल्या हिंदी चित्रपट संगीतात पाश्चिमात्य थाटाच्या संगीत कार्यक्रमात अडकून राहिला असं वाटतं. तथापि अजूनही आशा आहे !
भविष्य काळात समाजामध्ये राष्ट्रप्रेमासंबंधी जागृती निर्माण होईल. देशांमधल्या तरुणाईत राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणं ही काळाची गरज आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमाद्वारे ही जागृती निर्माण होऊन देश बलसागर व्हावा, हीच श्री गणेश चरणी विनम्र प्रार्थना !
.