
दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
ताडकळस या मिनी शहराची भौगोलिक परिस्थिती फार चिंताजनक अशीच आहे. परभणी जिल्हा स्थानापासून केवळ २७ कि.मी. अंतरावरील हे गाव पूर्णा नामक महसूली क्षेत्रात मोडते तर हे गाव मतदान करण्यासाठी मात्र गंगाखेड विधानसभा मतदार क्षेत्रात येते. त्रिकोणी भौगोलिक अवस्था असलेल्या ताडकळस गावाला पोलीस ठाणे मात्र स्थानिक आहे.
परभणी : जिल्हा स्थानापासून २७ कि.मी. अंतरावरच्या ताडकळस येथील रहिवाशांनी आपली घरे तोडली जाणार या भीतीमुळे आमदार डॉ. गुट्टे यांची भेट घेऊन चक्क हंबरडाच फोडला तर त्यांचे अश्रू पुसत तुम्ही घाबरु नका, मी तुमच्या विटेलाही हात लावू देणार नाही, हवं तर मी शासनाकडे पाठपुरावा करीन, असं सांगून आमदार गुट्टे यांनी अश्रू ढाळणाऱ्या त्या त्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे.
ताडकळस येथील गट क्रमांक ३१२ मधील सैनिक नगर व बाळाराज नगर या वसाहतीमध्ये जे रहिवासी मागील अनेक वर्षांपासून राहात आहेत. तरीही त्यांची घरे अतिक्रमणीत असल्याच्या कारण देत पूर्णा येथील तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी एकूण १७७ लोकांना नोटीसा बजावल्या आहेत. सात दिवसांत जागा रिकामी करावी असे नोटीसीत नमूद करण्यात आल्याचे समजते. अधिनियम १९९६ कलम ५० अन्वये बजावण्यात आलेल्या त्या नोटीसींमुळे मागील अनेक वर्षांपासून राहातं असलेली घरे केवळ सात दिवसांत खाली करुन तोडली जाणार या धसकीने कोणाचाही हंबरडा फुटल्यावाचून राहाणार नाही.
दरम्यान या प्रकरणाची खबर मिळताच गंगाखेड मतदार संघाचे समाज पक्षाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी क्षणाचाही विलंब न लावता ताडकळस येथील त्या रहिवाशांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी उपस्थित रहिवाशांचे पानावलेले डोळे पहात “तुम्ही घाबरु नका, तुमच्या विटेलाही हात लावू देणार नाही, हवं तर मी शासनाकडे पाठपुरावा करीन. याप्रकरणी मी तहसीलदार, एसडीएम यांच्याशी फोनवरून बोलणं केलं व तशी कोणतीही कारवाई करु नका असे बजावले” असा दिलासा देण्याचे काम केले. त्यामुळे रहिवाशांनी आ. गुट्टे यांचे आभार व्यक्त केले.
दरम्यान ज्या विधी मंडळाने कायदे केले आहेत, त्याच कायद्याच्या अनुषंगाने पूर्णा तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी अतिक्रमित कारवाई संबंधी नोटीसा बजावल्या आहेत, त्याच कायद्याला विरोध करण्याचे काम जेथे कायदे बनले जातात, त्या विधानसभेचे सदस्य आ. डॉ. रत्नाकर गुट्टे कसे काय करु शकतात हा खरा प्रश्न आहे.