
दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : योनेक्स सनराईस पश्चिम विभागीय आंतरराज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा दि. ०७ ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. आंतरराज्य स्तरावरील या स्पर्धा आयोजित करण्याचा मान संबंध देशभरातून महाराष्ट्राला अन् महाराष्ट्रातून आपल्या परभणीला मिळाला आहे. यजमान पदाचा बहुमान मिळाल्यामुळे परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. या स्पर्धेत एकूण पाच राज्यांतील स्पर्धकांचे गट भाग घेणार असून त्यात वरिष्ठ व कनिष्ठ (१९ वर्षांखालील) असे प्रत्येकी दोन संघ असा अंतर्भाव राहिला जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विजय जामकर आणि सचिव रवींद्र देशमुख यांनी दिली.
पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या पाच राज्यांतील वरिष्ठ गट व कनिष्ठ गट (१९ वर्षां खालील) असे प्रत्येकी दोन संघ या ५ राज्यांतून खेळले जाणार आहेत.
भारतीय बॅडमिंटन संघटना व महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हा शटल बॅडमिंटन संघटना सदर पश्चिम विभागीय आंतरराज्य स्पर्धेचे यजमानपद भूषवित आहे. यापूर्वी सुध्दा चार स्तरीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन यशस्वीरीत्या पार पाडले आहे. त्याशिवाय पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठीय स्पर्धांचे आयोजन करुन परभणी जिल्हा संघटनेने जो बहुमान पटकावला होता तो अथक अशा प्रयत्नांतून झाला होता. एवढंच नाही तर त्यामुळे संबंध मराठवाड्याचे नाव रोशन झाले आहे. लौकिक केवळ जिल्हा संघटनेचाच नाही तर संबंध मराठवाड्याचाही वाढला आहे. मागील वीस वर्षांत जिल्हा संघटनेने राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळाविषयीची उच्च कोटीची कुशलता व त्यातील अदाकारी पेश करुन समस्त जनांची मने जिंकता येतील असे असंख्य नामांकित खेळाडू घडविले आहेत. हे सर्वदूर परिचित असल्यानेच पुन्हा एकदा यजमान पदाचा बहुमान मिळाला आहे. ही बाब जिल्हा संघटनेच्या बाबतीत निश्चितच गौरवास्पद अशीच म्हणावी लागेल, असेही अनेकांकडून ऐकावयास मिळत आहे.
विविध समित्यांचे गंठन करुन त्याविषयी आवश्यक असणारी सर्व प्रकारची तयारी जिल्हा संघटनेने अधिकच जोमाने सुरु केलेली आहे. बॅडमिंटन कोर्टवर होणाऱ्या नवनवीन व नामांकित स्पर्धांची मेजवानी जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या अथक प्रयत्नांमुळेच समस्त परभणीकर क्रीडा रसिकांना पहावयास मिळणार आहेत. आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या अंगी असलेली सुप्त कुशलता परभणीच्या रसिकांना जवळून पहायला मिळणार आहे, अवगत करायला मिळणार आहे.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्याने ख्याती मिळवली आहे, असे राजेश मल्या व त्यांचा एकूण १५ जणांचा चम्मू (संघ) खेळाडूंची कुशलता हेरुन त्यांच्या नोंदी करण्याचे काम पहात आहे. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे निरिक्षक तथा बॅडमिंटन मधील तज्ज्ञ मयूर पारेख व संजय मिस्त्री यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली जाणार आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लोकांनी, प्रदीप गंधे, सुंदर शेट्टी, अशीष वाजपेयी यांच्यासह प्रदेश पातळीवरील कार्यरत असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहाणार आहेत.
स्पर्धा यशस्वीतेसाठी सचिन अंबिलवादे, डॉ.श्याम जेथलिया, सुधीर माडगूळकर, आशीष शहा, विजय मुंदडा, विनोद जेठमलानी यांचेसह त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी अथक परिश्रम करीत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा परभणी शहरात संपूर्ण क्रीडा विश्व अवतरणार आहे एवढे नक्की.