
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत.
वेळापत्रकानुसार, अमित शहांनी अहमदाबादमध्ये सर्वप्रथम स्मार्ट शाळांचं उद्घाटन केलं. यानंतर ते अखिल भारतीय जेल ड्युटी मीटमध्ये सहभागी झाले.
यावेळी बोलताना गृहमंत्री शहा म्हणाले, समाजाचा तुरुंगाकडं पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. तुरुंगातील प्रत्येक व्यक्ती स्वभावानं गुन्हेगार नसतो. कधीकधी परिस्थिती त्याला गुन्हा करण्यास भाग पाडते, असं त्यांनी स्पष्ट केलं. समाज नीटनेटका ठेवण्यासाठी गुन्हेगारांना शिक्षा होणंही गरजेचं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.
शिक्षा झाली नाही तर भीती राहणार नाही. जेव्हा भीती नसते, तेव्हा शिस्तही पाळता येत नाही. जे जन्मत: गुन्हेगार नाहीत, त्यांना बहाल करण्यासाठी तुरुंग प्रशासनानं पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. यापूर्वी अमित शहांनी अहमदाबादमध्ये 4 स्मार्ट शाळांचं उद्घाटन केलं. उद्घाटन समारंभात आपल्या भाषणादरम्यान गृहमंत्र्यांनी सांगितलं की, अहमदाबाद शहरात 22 अद्वितीय स्मार्ट शाळा तयार होत आहेत आणि यापैकी चार शाळा आज सुरू झाल्या आहेत. या शाळांच्या माध्यमातून 3200 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळणार असल्याचंही शहा म्हणाले. एक दिवसीय दौऱ्यात गृहमंत्री अमित शाह अहमदाबाद, गुजरातमध्ये तीन कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.