
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे ढोल बडवणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचे अर्थकारण पुरते बिघडल्याचे समोर आले आहे? मार्च 2022 अखेर देशाच्या डोक्यावर असलेले परकीय कर्ज तब्बल 620 अब्ज डॉलरवर पोहचले आहे.
मागील वर्षाचा विचार करता एकूण कर्जाची रक्कम 8.2 टक्क्यांनी वाढली आहे. हे कर्ज देशाच्या विदेशी चलन साठय़ापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था किती मजबूत आहे यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या डोक्यावर असलेल्या विदेशी कर्जापैकी 53.2 टक्के हिस्सा हा अमेरिकन डॉलरच्या रूपात देय आहे, तर हिंदुस्थानी रुपयाच्या रूपात देय कर्ज केवळ 31.2 टक्के आहे. कर्जाच्या बाबतीत देशाची परिस्थिती अत्यंत नाजूक असतानाही सध्या विदेशी कर्जाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे सरकार म्हणत आहे; परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत विदेशी कर्ज हे देशाच्या परकीय चलन साठय़ापेक्षा अधिक झाले आहे.
अनिवासी हिंदुस्थानींच्या ठेवीत घट
देशाला परकीय चलन मिळवून देणारा अनिवासी हिंदुस्थानी (एनआरआय) हा एक मोठा घटक आहे, मात्र गेल्या वर्षभरात त्यांच्या ठेवी दोन टक्क्यांनी कमी होऊन 139 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्या आहेत. तर व्यावसायिक कर्ज 5.7 टक्क्यांनी वाढून 209.71 अब्ज डॉलर्ससवर पोहोचले. शॉर्ट टर्म ट्रेड क्रेडिट 20.5 टक्क्यांनी वाढून 117.4 अब्ज डॉलर्स एवढे झाले आहे.
=====================
80 टक्के कर्ज दीर्घ मुदतीचे सध्या देशाचे विदेशी कर्ज योग्यरितीने व्यवस्थापित केले जात असल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले. मार्च 2022 अखेर हे कर्ज 620.7 अब्ज डॉलर्स इतके झाले. एक वर्षापूर्वीच्या तुलनेत यात 8.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असेही अहवालात सांगण्यात आले आहे. सध्या देशावर 499.1 अब्ज डॉलर्सचे दीर्घकालीन कर्ज आहे. हे एकूण विदेशी कर्जाच्या 80.4 टक्के आहे, तर 121.7 अब्ज डॉलर्सचे कमी कालावधीचे कर्ज आहे. ते एकूण कर्जाच्या 19.6 टक्के असल्याचेही अहवालात म्हटले आहे.