
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- माधव गोटमवाड
कंधार : हाळदा सिध्दतिर्थधाम येथील नराशाम प्राथमिक शाळा सिध्दतीर्थधाम हाळदा ता. कंधार येथील मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेश मटमवार यांनी एकूण पाच अनाथ व होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शिक्षक दिन साजरा केला.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेतील अनाथ, गरीब व होतकरू मुलामुलींना दत्तक घेऊन शैक्षणिक साहित्य (वह्या, पेना, शालेय दप्तर, गणवेश आणि परीक्षा शुल्क) देऊन मदतीचा एक हात पुढे केले. तसेच याप्रसंगी स्व-लिखित भारतातील महान रत्ने हे पुस्तक दत्तक विद्यार्थ्यांना देऊन वाचनसंस्कृती वाढविण्याचे प्रयत्न केले. कु. आरती आत्माराम झुंकुटवाड, कु. कल्याणी राजू गायकवाड, कु. गंगासागर आनंदा रामरुपे, महेश यादव पैलवाड, रामेश्वर बंडू गायकवाड आदि दत्तक विद्यार्थी आहेत.
मुख्याध्यापक मठमवार यांनी हा उपक्रम गेल्या दहा वर्षापासून (कोरोनाचा काळ वगळता) यशस्वीरित्या राबवत आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक राजेश मटमवार यांच्या नवोपक्रमाबद्दल पालकवर्गात विशेष कौतुक होत आहे.
याप्रसंगी सहशिक्षक व्ही. डी. पवारे, पी. जी. भोसले, वाय. एम. नागुशेरे आदि उपस्थित होते.