
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणजे देशभक्तीचे मोठे उदाहरण आहे. त्या लढ्यात कित्येकांनी प्राणांचे बलिदान दिले. प्रचंड प्रमाणात अन्याय, अत्याचार सहन केलेला हा मराठवाडा आणि मराठवाड्यातली सर्व जनता यांनी आपले सर्वस्व अर्पण करून पुढच्या पिढीला स्वातंत्र्याचे अमृत दिले. संघर्ष आणि बलिदानाशिवाय जगातल्या कोणत्याही देश, प्रांताला स्वातंत्र्य मिळाले नाही. या बलिदानाचे स्मरण रहावे व स्वातंत्र्याची किंमत पुढच्या पिढीला कळावी म्हणून १७ सप्टेंबर रोजी आपण ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करतो.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले पण त्यावेळी मराठवाडा स्वतंत्र झाला नव्हता. मराठवाड्यातले आठ जिल्हे, तत्कालिन आंध्रप्रदेशचा काही भाग आणि कर्नाटकचा काही भाग मिळून हैद्राबाद संस्थान होते. स्वातंत्र्यापूर्व भारतातील जी साडेपाचशेच्यावर संस्थाने होती त्यापैकी स्वतंत्र भारतात विलिन होण्यास नकार देणाऱ्या संस्थानापैकी हैद्राबादचे हे एक संस्थान होते. १९३८ पासून मराठवाडा अर्थात हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यास सुरूवात झाली. ज्याचा शेवट १७ सप्टेंबर १९४८ मध्ये मराठवाड्याच्या स्वातंत्र्याने झाला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हा मुक्तीसंग्राम सुरू झाला. दिगंबरराव बिंदू, भाऊसाहब वैशंपायन, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंह चौहान, काशिनाथ कुलकर्णी, गोविंदराव पानसरे आदी सह लाखो लोकांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी हा लढा लढला. निजाम मीर उस्मान अली याच्या तावडीतून मराठवाडा मुक्त केला.
नांदेडचा सहभाग
मराठवाडा मुक्तीसंग्रामात नांदेड हे लढ्याचे मोठे केंद्र होते. जयवंतराव पाटील, साहेबराव बारडकर, माधवराव नांदेडकर, सुनंदा जोशी बेलुर्गीकर, कॉ. अनंतराव नागापूरकर, ताराबाई परांजपे, सिताराम पप्पू, प्राचार्य गो. रा. म्हैसेकर, गोपाळशास्त्री देव, भगवानराव गांजवे, सरसर बंधु, गंगुताई देव, पदमाकर लाठकर, किशोर शहाणे, शंकरराव चव्हाण, नरेंद्र आर्य, विनायक विद्यालंकार, सरस्वती बोधनकर, आदींचा फार मोठा सहभाग होता. त्यांनी सशस्त्र लढा, गुप्तपणे पत्रके वाटणे, शस्त्रास्त्रे पुरविणे आदी क्रांतीकारी कामे केली.
निजामाच्या रझाकारांनी मराठवाड्यातील जनतेवर खूप अत्याचार केले. त्याच्या विरोधात मराठवाड्यातल्या जनतेने स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने लढा दिला. कंधार तालुक्यातील कल्हाळी गावातील आप्पासाहेब नाईक यांनी निजाम सरकारच्या अधिकाऱ्याला गोळी घालून ठार केले. त्यानंतर आप्पासाहेबांनी तब्बल २६ रझाकारांना ठार केले. गोविंदराव पानसरे शिक्षण सोडून आंदोलनात सहभागी झाले. निजाम व रझवीविरूद्ध प्रभावी भाषण केल्यामुळे रझाकाराच्या गुंडानी त्यांना ठार केले. डिसेंबर १९४७ ला साहेबराव बारडकर, दिगंबरराव बिंदू, परांजपे, बोधनकर आदींनी उमरी बँक लुटली आणि सगळा पैसा मराठवाडा मुक्तीसाठी लावला. याशिवाय नांदेड जिल्ह्यातील अनेक स्त्रियांचाही या सशस्त्र चळवळीत सहभाग होता.
..आणि मराठवाडा स्वतंत्र झाला
दुहेरी पारतंत्र्यात असलेल्या मराठवाड्याला स्वातंत्र्यासाठी खूप कष्ट करावा लागले. भारत स्वतंत्र होतांना भारतातली सगळी संस्थाने स्वतंत्र भारतात विलिन होण्यास तयार झाली, परंतु हैद्राबादचा हा सातवा निजाम मीर उस्मान अली याने विलिन होण्यास नकार दिला. त्याचा विचार पाकिस्तानात सामील होण्याचा होता. त्यामुळे त्यावेळेसचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैद्राबाद संस्थानावर पोलिस क्शन केले. चार दिवस धुमश्चक्री होवून अखेर १७ सप्टेंबर १९४८ रोजी गृहमंत्री सरदार पटेल यांच्यासमोर निजाम शरण आला.