
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी -दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी शहरासह राज्यात सर्वत्र भुरट्या चोऱ्या, जबरी चोऱ्या, दुकाने व घरफोड्या, अबाल महिलांची दिवसा ढवळ्या लूटीचे प्रकार थैमान घालत आहेत. यातील लिप्त महाभाग चोर, दरोडेखोर मोठमोठे बंगले फोडत आहेत. लाखोंची पूंजी, माया लुटून पोबारा करीत आहेत. दिवसाढवळ्या बॅंकांवरही दरोडे टाकून प्रसंगी खूनासारखे गंभीर प्रकार घडवून आणत आहेत व त्यातूनच करोडोंची पूंजी जमा करीत आहेत. एवढ्यावरही पोटं आणि खाचखळगी भरत नसावेत म्हणून की काय आता चक्क देवांनाही लुटायला लागले आहेत. या सर्व चीड आणणाऱ्या घटना कोणत्या अधोगतीकडे घेऊन जातील, हेच कळेनासे होऊन बसले आहे. मंदिरांतील देवी-देवतांच्या शिखरावरील सोन्या-चांदीची छत्रे, मुकुटं चोरले जात आहेत. एवढेच नाही तर हनुमानजींचे सोन्या-चांदीने मढवलेले डोळेही उघड्या डोळ्यांनी खुलेआम चोरुन पोबारा करणारे हे चोर, दरोडेखोर, लूटारु, डाकूंनी पूरता उच्छाद मांडला आहे. तर दुसरीकडे स्मशानातल्या मढ्यांची राखही आता याच चोरांना पुरेनाशी झाली आहे. त्या राखेवरही चोरीचा डल्ला मारुन भन्नाट कमाई कमावण्याचे अश्लाघ्य प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहेत. जणू काही “ॲश पे ऐश” असेच निंदनीय प्रकार सुरु केले आहेत.
शहरे, गावे परिसरात होणाऱ्या चोऱ्या, लूटमाऱ्या, दरोडे, बंगले, बॅंकाफोडून केले जाणारे लूटीचे प्रकार कमी पडत असावेत म्हणून की काय, आता मंदीरे सुध्दा फोडून त्यातील देवी-देवतांचे दागिने, जड जवाहिरे लूटले जात आहेत. पवनसूत हनुमानजींचे मढवलेले सोन्या-चांदीचे डोळेही चोरुन नेत्यांपर्यंतची मजल वाढीस लागली आहे. नामस्मरण व भक्तीभावाने तल्लीन भक्तांना पावणारे हेच देवी देवता चोऱ्या करणाऱ्यांना काहीच कसे करीत नसावेत, हा खरा सवाल भक्तांकडूनही विचारला जाणे स्वाभाविक आहे. चोरांना देवाची भीती वाटत नसावी काय ? का देवाचीच त्यांना रान मोकळे सोडले असेल, हे न कळणारे इंगीत व न उलगडणारे मोठे कोडेच म्हणावे लागेल. शासनाने हे सारे प्रकार कायमचे बंद व्हावेत यासाठी कठोर नियमावली बनवून त्यासाठी निव्वळ नागरी सुरक्षा पोलिसांवरच विसंबून न राहाता चोरी प्रतिबंधक असा स्पेशल स्क्वॉड व विभागीय पोलीस ठाण्यांची निर्मिती आणि पोलीस बलाची नियुक्ती करणे अत्यंत आवश्यक ठरणारे आहे. एक तर या चोर लुटारुंचा कायमचा बंदोबस्त करुन त्यांचे समूळ उच्चाटन तरी करा, नाही तर जागोजागी त्यांचे सत्कार सोहळे आयोजित करुन मान, सन्मानाचे पुरस्कार, प्रमाण पत्रे देऊन गौरव सोहळे आयोजित करण्याचे फर्मान तरी सोडावे म्हणजे नागरिकांच्या तक्रारींना वावच उरणार नाही.
शहरांत, गावागावांत, भर रस्त्यांवर, गल्लीबोळात, चौकाचौकांत दिवसेंदिवस जबरी चोऱ्या, अबला, महिलांची लूट, दुकाने, घरफोड्या, बंगले, बॅंका लूटीचे भयानक प्रकार वाढीस लागल्याने महिला, सर्वसामान्य माणसे, कर्तव्यावर जाणारा कर्मचारी असो वा अधिकारी, व्यापारी, उद्योजक, कारखानदार, कोणी कोणीच सुरक्षित राहिला नाही. घराबाहेर पडणारा प्रत्येकजण संध्याकाळी सुरक्षित घरी येईल का नाही, याचीही काडीमात्र शाश्वती उरली नाही. ज्यांच्या नामस्मरणाने सगळे दु:ख नाहिसे होतात, भजन कीर्तनाने मनं प्रफुल्लित राहातात, भक्तीभावाने संकटे नाहीशी होतात अशी समस्त नागरिकांची भावना असते परंतु या देवी-देवतांनाही न घाबरता अगदी खुलेआम लुटले जात आहे तेथे माणसांची काय कथा. आता फक्त उरली आहे उभ्या जीवाची व्यथा आणि कथा. पण ती सुध्दा शासन किंवा त्यांचे आदेशीत कार्यालये तर ऐकून घ्यायला किंवा त्यांचे निरसन करायला मुळीच तयार असल्याचे दिसून येत नाहीत. त्या आता फक्त घरोघरी सांगायचे तेवढेच काम बाकी राहिले आहे. गोवा, गुटखा, ब्राऊन शुगर, विविध अंमली पदार्थांची व नशेबाबतच्या वस्तूंची बंदी ही केवळ कागदांवर नि दफ्तरापुरतीच शिल्लक राहिली आहे. त्यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण राहिले नाही. गल्लीबोळातून गर्दुल्यांचा सुळसुळाट वाढीस लागला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वर्धा जिल्ह्यात व गुजरातमध्ये निषिद्ध क्षेत्र असूनही तेथे दारुचे पॉट वाहत आहेत तर महाराष्ट्रात ढिसाळ सुरक्षा यंत्रणेमुळे जागोजागी रक्ताचे सडे पडले जात आहेत, खून होत आहेत, तरुणी व महिलांची अब्रू दिवसाढवळ्या लूटली जात आहे. याच गंभीर प्रकरणांतून कित्येकांचे मुडदे पाडले जात आहेत. शाळकरी मुलं सुध्दा सुरक्षित राहिली जात नाहीत. आर्थिक परिस्थितीमुळे बेजार कुटुंबातील अल्पवयीन व तरुण मुलींना फूस लावून पळवून नेले जात आहे. त्यांचे जबरीने परप्रांतीयांशी लग्न लावून स्वतः:चे उखळ पांढरे करुन घेतले जात आहे. शाळकरी मुलांनाही फूस लावण्याचे व बेहोश करुन पळवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. मोठमोठ्या डॉक्टरांच्या सांगण्यावरुन याच बेहोस मुलांना अमाप अशा किमतीत विकण्याचे निंदनीय प्रकार घडले जात आहेत. त्यापोटी मोठ्या रकमेची लालसा देवून कथित टोळ्या त्याच डॉक्टरांनी कामाला लावल्याचे बोलले जात आहे. गरीब घरच्या मुलींना बेभाव विकले जात आहे. पैशासाठीच मशिदीतले मुल्ला मौलवी आणि चर्चमधले (काही अपवाद वगळता) पाद्री सुध्दा गैर धंद्यांमध्ये गुंतले आहेत. स्वतःला धर्मगुरू समजले जाणारे काही मौलवी आणि पाद्री तर चक्क दाऊदशी संधान साधून आहेत. तरीही त्याला अच्छे दिन मानायचे असा माननीय पंतप्रधानांचा मौलीक सल्ला आहे. तरीही
या साऱ्या घडणाऱ्या गंभीर घटनांवर खरोखरच नियंत्रण आणायचे असेल आणि अगदी लहान मुलांपासून ते वयोवृध्दांपर्यतचे सर्व नागरिक सुरक्षित राहिले जावेत अशी मनोमन इच्छा असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सर्वत्र दुसरे पोलीस बल तेवढ्याच संख्येने उभारुन विभागीय पॅरेलल् पोलीस ठाण्याची निर्मिती करुन त्यांच्यावर फक्त आणि फक्त याच गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याची आणि गुन्हेगार व गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठीची जबाबदारी सोपविणे गरजेचे आहे. तर आणि तरच राज्यातील प्रत्येक जण सुरक्षित राहिला जाईल. खाकी वर्दीचा धाक राहिला जाईल. सुशिक्षित तरुणांना पोलीस भरतीत मोठ्या संख्येला वाव मिळेल. या बाबतीत लागणारी खर्चाची लागत अन्य मार्गातून उभी केल्यास आर्थिक स्त्रोतही कमालीचा वाढू शकेल खर्चापेक्षा उत्पन्नाचा स्रोत अधिक प्रमाणात राहिला जाईल यासाठीचे नियोजन मोठ्या आकड्यात कसे राहिले जाईल यावर कटाक्ष ठेवणे गरजेचे आहे. शासन स्तरावरील सर्वच प्रशासकीय यंत्रणेवर समन्वय राखता यावा, समतोल राखला जावा यासाठी त्या तोडीची अधिकारी यंत्रणा उभी करावी लागेल तरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासकीय व राजकीय लौकिक वाढीस लागेल अन्यथा यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी जे दिवे लावले तसेच हे सुध्दा लावतील व लुटून खातील अशीच धारदार टीका लोक करतील यात तिळमात्र शंका नाही. अन्यथा मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे आणि मढ्यांची “ॲश” विक्रीच्या भन्नाट कमाईतून “ऐश” करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या आकड्यात वाढल्याशिवाय मुळीच राहाणार नाही याचे राज्यकर्त्यांनी पूरते भान ठेवणे गरजेचे आहे. भयानक टक्केवारी, गैरधंद्यातून मिळणारे लाखो, करोडोंचे कमिशन, बेकायदेशीर बांधकामांतून मिळणारी अव्वाच्या सव्वा काळी कमाई, माती, खडी, वाळू उत्खननातून मिळणारी बेफाम कमाई करणारेच लोक आजमितीला राजकारणात जसे मोठ्या दिमाखात वावरत आहेत, सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने खोऱ्याने कमाई सावडत आहेत, किंबहुना तसेच लोक भविष्यात मढ्याच्या “ॲश” विक्रीतून भन्नाट कमाईपोटी “ऐश” करु पहाणारेच उद्याचे महान नेते ठरले जातील याला मुळीच वेळ लागणार नाही, नव्हे ती वेळ बघायचा दिवसही काही दूर नाही असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
— लेखक —
दत्तात्रय वामनराव कराळे
दै.चालू वार्ता,उपसंपादक परभणी