
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : पूर्णा शहर रेल्वे स्थानक परिसरातील तडीपार मैदानात एका वीस वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
सदर घटनेची खबर कळताच पूर्णा पोलीस ठाण्याचे व.पो.नि. सुभाषचंद्र मार्कड हे आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी तातडीने गेले. दिवसाढवळ्या झालेली ही खूनाची गंभीर घटना अनेकांना संशयाच्या बुचकळ्यात टाकणारी असल्याचे बोलले जात आहे.
सदर तरुणीची ओळख पटली जाऊ नये यासाठी दगडाने ठेचून तिचा चेहरा विद्रूप करून टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे मृतावस्थेतील या तरुणीच्या अंगात काळा बुरखा परिधान केला गेला आहे. कदाचित सदरची तरुणी नेमकी कोण आहे, हे कोणाला समजू नये यासाठी किंवा ती मुस्लिम असल्याचे भासवून जातीय तेढ निर्माण करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न झाला असावा, याचेही कोडे न उलगडणारे असावे हा भाग मात्र संशोधनाचा ठरु शकेल.
पूर्णा शहरापासून काही अंतरावर असलेल्या तडीपार नामक सुमसान मैदानात ही घटना घडली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनीही धाव घेऊन परिस्थिती व घटनास्थळाची पहाणी केली. तातडीने तपास लागला जावा, यासाठीचे जयंत मीना यांनी स्थानिक पोलीस व सहकारी अधिकारी यांना महत्वपूर्ण निर्देश दिल्याचेही समजते. एकूणच ही खूनाची घटना प्रचंड खळबळ उडवून देणारी अशीच असल्याचे बोलले जात आहे.