
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकरा.
२३१ जणांना सर्पदंश:जनजागृती करण्याची गरज
जव्हार:- : जव्हार सारख्या आदिवासी आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांची गुजराण ही पावसाळी शेतीवर अवलंबून आहे असून येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या डोंगर उतारावर आणि जंगलात असल्यामुळे सर्पदंश होण्याचा धोका अधिक असतो.तालुक्यातील ग्रामीण भागात खरीप हंगामात २३१ जणांना सर्पदंश झाला असून जव्हार येथील पतंग शाह उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंशाने मृत्यू झालेल्या एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामदास मराड यांनी बोलताना दिले आहे.मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा सर्पदंशांच्या घटनात वाढ झाली आहे.
तालुक्यात नांदगाव,साकुर,साखरशेत व जामसर अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात जूनमध्ये ५८,जुलैमध्ये ७९ जणांना तर ऑगस्ट महिन्यात ५३ जणांना सर्पदंश झाला आहे.
जनजागृती अत्यंत महत्त्वाची –
अज्ञानामुळे सर्पदंश झाल्यानंतरही रुग्णाला उपचारासाठी सरळ दवाखान्यात नेण्यासाठी उशीर होणे,वेळेवर दवाखान्यात पोचण्यासाठी वाहनांची अनुउपलब्धता किंवा बिनविषारी साप असल्यास रुग्णाला अपाय होत नाही.त्याचा जीव वाचतो.मात्र विषारी साप असल्यास बऱ्याचदा रुग्ण मृत्युमुखी पडल्याचे उघड झाले आहे.सापांची ओळख असणे महत्त्वाचे आहे.विषारी व बिनविषारी साप कोणते या विषयीची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृती हाच एकमेव उपाय आहे.खरीप हंगामातील पावसाळ्याला सुरुवात होताच शेतकरी आपल्या शेतीकडे वळतो.शेत रोवणीच्या हंगामात तसेच निंदणी व जनावरांसाठी गवत घेण्याच्या वेळी सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात.मात्र वेळीच उपचार झाल्यास रुग्णांचे जीव वाचण्याची शक्यता असते.सर्पदंश झाल्यावर त्वरित उपचार व्हावेत यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्णालयात पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध असतो.
सर्पदंश झाल्यावर घाबरून न जाता नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे तेथून प्रथमोपचार केल्यानंतर आवश्यकता नुसार संदर्भ सेवा प्राप्त करून घ्यावी.कोणत्याही परिस्थितीत स्थानिक अथवा घरगुती उपचारात वेळ वाया घालवू नये.
डॉ.किरण पाटील,तालुका आरोग्य अधिकारी,जव्हार
साप आढळल्यास तत्काळ जवळच्या सर्पमित्रांशी संपर्क साधावा त्यांना निश्चित ठिकाण सांगून सापावर लक्ष ठेवावे.सापाला मारू नये.
जितेंद्र पाटील-सर्पमित्र