
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी –
आनंद दिवाकर चक्रनारायण
मो 9422713727
मी आरे तले एक झाड बोलतोय !
मी कधी कान्हेरी लेणीतील बुद्धलेण्यांच्या झाडितुन
तर कधी बोधगया येथील बोधीव्रुक्षाच्या सावलीतुन , कधी चंबलच्या घाटीतुन ,कधी काझीरंगाच्या जंगलातून , कधी ताडोबा अभयारण्यातील वाघोबाच्या गुहेजवळील पाणथळी भागातून , कधी महाबळेश्वर च्या पायथ्याशी बसून, कधी मंत्रालयाच्या बगीच्यातील फुलांच्या घोळक्यातुन , आपल्या घरात शोभेने ठेवलेल्या मनी प्लांट वा पिंपळाच्या बोन्झाय डहाळीतुन बोलतो ! तुम्हांला प्रश्न पडला असेल कि मी नेहमीच अबोल असतो पण आज का बोलण्याचा प्रयत्न करीत आहे !
आज मला बोलण्यास कुणी उद्युक्त केले ? अहो साधा प्रश्न आहे !
जर मला अकारण कुणी छेडण्याचा प्रयत्न करीत असेल आणि माझ्या बांधवांच्या कत्तली करण्याचा तालिबानी आदेश देत असेल तरीही मी मुकाट्याने गप्पच राहू का ? नाही ! आज नाही बोललो तर उद्या माझीही अशीच कत्तल होईल ! आणि बोललो तरीही ! पण मुकाट्याने गप्प राहून मरण पत्करल्यापेक्षा आज मला बोलून शूरमरण आले तर ते मी आनंदाने स्विकारेल !
दोन तीन दिवसांपासून मी या माझ्या परिसरातील आणि माझ्या फळ फुल पान आणि वाळलेल्या सरपणावर अवलंबून असणाऱ्या रहिवासी बांधवांकडून त्यांच्या आपसात चाललेली चर्चा ऐकतोय ! कि या माझ्या अनेक पिढ्यांपासून असणाऱ्या हक्काच्या जागेवरील माझ्या बांधवांना हटवून नव्हे तर त्यांना जुलमाने सोलून आणि कापून काढून या ठिकाणी जलद प्रवासाला उपयुक्त असणारी रेल्वे ची एक खाजगी सेवा जिचे नाव मेट्रो असे आहे ती सुरू करनार असून तिला बनविण्यासाठी लागणारा कारखाना , तिचा मेंटेनेन्स करण्यासाठी असणारे गरेज , आणि तिच्यात प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना निवारा आणि त्यांच्या आजूबाजूला मोठमोठी कॉर्पोरेट ऑफिसेस असा एक नवा अजेंडा या सरकारने आपल्या सर्वांसमोर ठेवला आहे ! यासाठी त्यांना मेट्रो सिटी आणि भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत मोकळी जागा हवी होती ! अनेक ठिकाणी मोकळ्या जागा असतांनाही माझे कुटूंब , माझ भरलेलं घर , आणि माझी घनदाट अभय वस्ती उध्वस्त करून यांना जागा मोकळ्या करायच्या आहेत ! यातून यांना काय साध्य करायचे आहे हा मला पडलेला साधा प्रश्न आहे !
बरं ठीक आहे तुमच्याकडे पर्यायी जागा नाही पण म्हणून तुम्ही असले क्रुत्य कसेच करू शकता ? आणि ज्या न्यायव्यवस्थेकडे आपण तिसरा डोळा म्हणून पाहतो ती व्यवस्था “झाडांची कत्तल करा ! दिवसा जर तुमच्या कार्यात अडथळा येत असेल तर रात्रीतून झाडे कापा” असला निर्णय देऊच कशी शकते? साधी गोष्ट आहे निसर्गाने दिवस आणि रात्र बनविली ती कशासाठी ! दिवसा या प्रुथ्वीतलावरिल समस्त जीवजंतू आणि आम्ही झाडे अन्नाच्या शोधार्थ फिरून आपल्यासह चिल्यपिल्यान्चि भुक भागवतो आणि रात्रीला दमून थकून आराम करतो ! तुम्ही तुमच्या घरी निवांतपणे झोपलेले असतांना तुमचं घर उध्वस्त करून अन तुमच्या मुलाबाळांसोबत तुमचा कुणी पाशवी खून करीत असेल तर तुम्हांला काय वाटेल ! हा साधा आणि सरळ सोपा प्रश्न तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा ! कारण कुठल्याही चांगल्या अथवा वाईट गोष्टीचे मन हेच उगमस्थान असते ! तथागत बुद्धांनी आपल्या जागतिक कीर्तीच्या धम्मपदात चित्त वर्गात म्हटलेच आहे , “मनो पुब्बगमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया ! मनसाची पसन्नेन भासति वा करोति वा ! ततो नं सुख मन्वेति छाया व अनपायिनि !! ” सर्वच गोष्टींचे मन हें प्रधान असून उगमस्थान आहे ! जर मन प्रसन्न असेल तर जशी छाया आपल्या पाठोपाठ येते तसेच सुखही आपला पाठलाग करते ! मग तुमच्या मनात नेमके काय आहे ते आम्हाला कसे कळणार ? तुमचे मन आम्हा झाडांविषयी येवढे दुषित का ? बरं लोकप्रतिनिधी म्हणतात याला प्रशासन जबाबदार आणि प्रशासनाने म्हटले कि कायद्यापुढे आम्ही काहीही करू शकत नाही ! न्यायव्यवस्थेने निर्णयही कधी द्यावा तर जेव्हा आचारसंहितेचा बडगा उगारला जातो तेव्हा ! मग माझ्या सारख्या स्थितप्रज्ञ झाडाला असा प्रश्न पडतो कि ह्यांचं एकमेकांशी साटेलोटे तर नाही ना ! असो आज मी बोलण्याचा प्रयत्न जरी करीत असलो तरी माझी मुलं , माझे भाऊ बहीण नातलग मित्रमंडळींना मी कायमचा मुकलो आहे ! दररोज माझा हिरवा पाला आणि पाने तोडून जंगलात राहणारे तुमचेच रहिवाशी बांधव त्यांच्या पाळलेल्या दुध दुभत्या जनावरांना घेऊन जायचा ! त्यालाही उद्या माझा पाला आणि पाने मिळणार नाही ! सोबतच माझ्या वळलेल्या काड्या फांद्या यांचे सरपण म्हणून उपयोग करणारी त्यांची गृहीणी आता त्यांच्या उदरनिर्वाहासाठी चुलितुन धूर कुणाचा काढेल हें ही एक कोडेच आहे ! कारण ऊज्वला योजना फक्त हाइवे रोडवरील पेट्रोलपंपावर डिजिटल फ्लेक्स वरच शोभून दिसतेय ! त्यांच्या मुलांना माझी फळे खूपच आवडायची ! त्यातुनच त्यांना पौष्टिक खाद्यान्न मिळायचे ! आता त्यांचे कुपोषण होणार कि काय ही शंका मनाला पोखरून टाकतेय ! माझी फुले दररोज त्यांच्या श्रध्दास्थानाला वहायचे ! आता त्यांची श्रद्धा पोखरून जाते कि काय ! माझ्या सावलीत अनेक बैठका बसायच्या ! लग्नाच्या सोयरीकीपासून ते जन्माला येणाऱ्या मुलाच्या नावापर्यंत ! आणि एखाद्या घरच्या सौद्यापासून ते मोठ्या जमिनीच्या व्यवहारापर्यंत ! आता ह्या बैठका कुठे बसतील ? माझे आणि माझ्या आश्रयाने राहणारे गगनाला गवसणी घालणारे अगदी छोट्या चिमणीपेक्षाही लहान अन गरुडापेक्षाही मोठे पक्षी काळापासून सैरभैर झाले आहेत ! त्यांनी मोठ्या मेहनतीने माझ्या अंगाखांद्यावर बांधलेले कच्चे घरटे , त्यात त्यांनी घातलेली अंडी , आणि त्या अंड्यातून बाहेर पडलेली त्यांची पिल्ले , त्या पिल्लांच्या पंखांत उद्या पाहिलेले गगनभेदी भरारीचे स्वप्न आता स्वप्नच राहिले आहे ! त्या स्वप्नांचा अक्षरशः काल रात्री चुराडा झाला आहे ! माझ्या कुशीत दररोज नित्यनेमाने झोपणारा माझा लढवय्या पँथर बिबळ्या आता कुणाच्या कुशीत निजणार हा ही मला प्रश्न पडला आहे ! तो आता कुठे जाईल आणि कुठे राहील हें ही एक कोडे आहे ! त्याची सहचारिणी आता कुठेतरी दूरवर भटकंती करणार कारण तिला तो रोज माझ्या सान्निध्यात भेटायचा आता तिथे मीच नाही तर त्यांची भेट कशी होणार ? जंगलातून एखादे सावज गिळून रोज मला कडकडुन विळख्यारूपी मिठी मारणारा अजगर आता कोणाला मिठी मारणार ? माझी साल पोखरून त्यात घर बांधणारी वाळवी , किडे , मुंग्या आता कुठे घर बांधणार हा ही मोठा प्रश्न आहे ! हें दिसणारे जीवजंतू झाले पण जे तुमच्या डोळ्यांनीही दिसत नाहीत पण दररोज माझी लाखो करोडोंच्या संख्येने गळाभेट घेतात त्यांचा तर मृत्यू अटळच म्हणायचा ! वरुन पडणाऱ्या नैसर्गिक पावसाला मी माझ्या मुळात प्रुथ्वीला मध्यस्थी करून शोषून ठेवायचो ! आणि जमिनीचा पोत सुपीक बनवायचो! पाणथळ जागी तुमचेच भाऊबंद तांदूळ लावायचे तर कसदार जागी गहू ज्वारी बाजरी उडीद मूग तूर ! यावर तुमचा वर्षभराच्या जेवणाची सोय व्हायची !
आता याच जमिनीवरून माझी कत्तल करून मेट्रो धावणार आहे ! नव्हे तर तुम्हांला अन्नधान्यावाचून उपाशी ठेवून तुमच्या खिशातील पैसे आधी घेऊन शीतल वाऱ्याची ही हायटेक परी वाऱ्याच्या वेगाने पळणार आहे ! पण या हवेत माझा ऑक्सिजन नसणार आहे ! कारण तो तुम्ही आधीच मला ठार मारून गुदमरून टाकलाय ! तुम्हांला प्रत्येकाला 12*24*365 म्हणजे बारा महिने चोवीस तास तीनशे पासस्ट दिवस एक छोटा ऑक्सिजन चा सिलेंडर आपल्या गळ्यात अडकवून जगावे लागणार आहे ! कारण श्वासोच्छवासा शिवाय माणूस जगू शकत नाही ! मी तुम्हांला दररोज फ्री ऑफ कॉस्ट ऑक्सिजन प्रोव्हाइड करायचो पण तुम्हांला त्यांचे काहीच महत्व नव्हते ! आता जेव्हा तुमच्या गर्भात असणाऱ्या बाळालाही कंपल्सरी ऑक्सिजन सिलेंडर लागेल तेव्हा तुम्हांला माझे नसण्याच अस्तित्व कळेल ! तुम्ही आज ज्या शहरात राहता ती भारताची राजधानी असणाऱ्या मुंबईतला ग्लोबल रेस्पिरेशन इंडेक्स अत्यंत घातक असून खालच्या पातळीवर आला आहे ! दुषित हवा असणारा प्रदेश म्हणून त्याची ओळख आज झालीच आहे पण लवकरच दुषित श्वास असणारा प्रदेश व्हायला या प्रदेशाला वेळ लागणार नाही ! बाळाचे आईच्या गर्भातुन बाहेर आल्या आल्या डॉक्टर त्याच्या पाठीवर व छातीवर थाप मारून त्याला नैसर्गिक श्वास घ्यायला भाग पडतात ! त्या वेळेपासून ते त्याच्या नैसर्गिक वा अनैसर्गिक म्रुत्यूपर्यंत तो श्वास घेतच राहतो ! नैसर्गिकरीत्या श्वास घेणे हा निसर्गाने प्रत्येकाला दिलेला मुलभूत हक्क आहे ! पण या वातावरणात त्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन आणि ओझोन युक्त हवेची गरज असते ! पण जर या वातावरणातील ऑक्सिजन आणि ओझोनचा थरच जर तुमच्या अश्या क्रुत्याने नष्ट झाला तर ? तर या प्रुथ्वीतलावर एकही पशु पक्षी जीवजंतू जगु शकणार नाही ! एकीकडे तुमचे शासन 33कोटी व्रुक्ष लावण्यासाठी मोठमोठे एव्हेण्ट मेनेज्मेंट चे प्रोग्राम घेते आणि दुसरीकडे तेच शासन शे दोनशे वर्षे जुन्या व्रुक्षाची निर्दयपणे कत्तल करते ! तुम्ही ज्या परिसरात राहता त्या ग्रामपंचायत , नगरपालिका , महानगरपालिका अखत्यारीत आपल्या अंगणात असलेले झाड तोडायचे असेल तर लेखी अर्ज करून परवानगी घ्यावी लागते ! आणि जर झाड धोकादायक असेल , विजेच्या तारांना स्पर्श करीत असेल , किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असेल तरच त्याला तोडण्याची परवानगी देन्यात येते ! आणि एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावून त्यांना वाढविण्याची जबाबदारी आणि तसे लेखी आश्वासन प्रशासनाकडून घेतल्या जाते ! काल आरे तली जवळपास अडीच हजार झाडे निर्दयपणे कापली गेली त्या बदल्यात शासन साडेसात हजार झाडे त्या मेट्रोच्या स्टेशनशेजारी असणाऱ्या कॉर्पोरेट बिल्डिंगभोवती लावणार आहे काय ? मी जन्मल्यापासून तुमच्या नेहमीच उपयोगी पडतो ! तुम्ही खाल्लेल्या फळांची बी जमीनीवर पडते ! ती जमीन तिला आईप्रमाणे आपल्या कवेत घेते ! आभाळ बाप पाणी प्रसवतं ! आणि माझा अंकुर जमिनीबाहेर येतो ! मी झटपट वाढीला लागतो ! मी वाढत असतांना तुम्हीच माझी काळजी घेता ! मला पाणी टाकता ! कधी कधी माझ खाद्य खत टाकता ! आणि मी कधी माझ्या बापाच्या म्हणजेच आभाळाला गवसणी घालण्यासाठी सज्ज होतो ! मी जसजसा मोठा होत जातो तसतसा माझा उपयोग तुम्ही घेऊ लागता ! मी प्रत्येकाच्या उपयोगी पडतो ! मि दिवसभरात अनेक अगणित ऑक्सिजनचे श्वास आपल्या प्रत्येकाच्या श्वासात विना मोबदला भरण्यासाठी प्रयत्नशील असतो ! माझ्या पाने , फुले , डहाळ्या , वाळलेल्या काड्या , साल , मुळे , अंकुर यावर आयुर्वेदिक औषधे बनविली जातात आणि अनेक रुग्णांना त्यांचा जीव वाचविण्यासाठी उपयोगी पडतात ! जेव्हा माझा नैसर्गिक मृत्यु होतो तेव्हा माझी वाळलेली काया म्हणजेच लाकडे तुमच्या मृत्यूनंतरच्या कायेला जाळण्यासाठी उपयोगी पडतात ! आज माझा तुम्ही असा अमानुष मृत्यु घडवून आणला आहे ! तुमच्या मृत्यूनंतरच्या उत्तरक्रियेसाठी लाकडे कुठून आणणार ? एक तुम्हांला सांगतो कुठलीही वस्तू जळून खाक होण्यासाठी लाकडेच हवी असतात ! जर लाकडे नसतील तर तुमच्या मृत्यूनंतरच्या बॉडया अर्धवट जळून निसर्गात पुनः प्रदूषण पसरवतील यात तिळमात्र शंका नाही ! आत्ताच काही लघुशंकेंच्या निमित्ताने काही आपले सैनिक आलेत आणि आपसात कुजबुजताहेत की सर्वोच्च न्यायालयाने या झाडांना कापन्यास स्थगिती दिली आहें ! बरं झालं माझे काही बांधव तर काही दिवस जिवंत राहतील ! आणि तुम्हाला ऑक्सिजनचा पुरवठय़ाची सोय करतील ! पण आज तुम्हांला मि या झाडांचा एक प्रतिनिधी म्हणून सांगु इच्छितो की मला तुम्ही कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरीही मि मरणार नाही ! मला खोडापासून कापले तरी मी त्या खोडाखालून उगवेन ! मला जमिनीपासून कापले तर मुळापासून उगवायचा प्रयत्न करेन ! अन अगदी मुळापासून कापले तरीही मी मुळाच्या एका छोट्याश्या तुकड्यातुन पुन्हा पुन्हा उगवत राहीन ! कारण मी स्वतःसाठी जगत नाही तर तुमच्यासाठी जगतो ! प्रत्येक जन्मात मी बोधिसत्वासारखी एकेक पारमिता पूर्ण करत असतो ! कारण माझ्याच सान्निध्यात सिद्धार्थ गौतम या राजकुमाराला सम्यक सम्बोधि प्राप्त झाली होती आणि त्याने समस्त प्राणीमात्राचा कल्याणकारी सुखाचा धम्ममार्ग शोधून काढला होता ! अनायासे उद्या सिद्धार्थ गौतम बुद्धांनी फिरविलेल्या धम्मचक्क प्पवत्तनाचा आणि सम्राट अशोकाने युद्ध नको बुद्ध हवा या विचाराने प्रेरित होऊन तलवार म्यान करून स्वीकारलेल्या धम्माचा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पाच लाख अनुयायांना दिलेल्या धम्मदिक्षेच्या सोहळ्याचा दिन आहे ! आणि आज सर्वोच्च न्यायपालिकेने आम्हांला कापू नये म्हणून काही दिवस तरी स्थगिती दिली आहे ! आज माझ्या मनांत परत एकदा बुद्धांची मैत्री , करुणा आणि मूदिता जाग्रुत झाली आहे ! मी पुन्हा एकदा नव्याने जन्म घेण्यासाठी तयार आहे ! तुमच्या जीवनासाठी ! कारण तुम्हा मनुष्यांना आयुष्य फार कमी लाभते आणि मनुष्य जन्मही दुर्मिळच लाभतो ! आमच्यासारखे तुम्ही अनेक वर्षे जगत नाहीत ! म्हणून तुमच्या पुढच्या पिढ्या सुखाने जगवीण्यासाठी , त्यांना नैसर्गिकरीत्या श्वासोच्छवास घेण्यास ऑक्सिजन आणि ओझोन निर्मिती करण्यासाठी मला जगणे क्रमप्राप्त ठरते ! तुमच्यातीलच काही जण आमच्या पाठीशी आहेतच ! म्हणून शेवटी मला असे बोलावेसे वाटते की फुलांनी विसरू नये की मी फळांमुळे आहे ! फळांनी विसरू नये मी फांदीमुळे आहे ! फांदीने विसरु नये मी खोडामुळे आहे ! खोडाने विसरु नये की मी मुळांमुळे आहे ! मुळांनी विसरु नये की मी जमिनीमुळे आहे ! जमिनिने विसरू नये की मी आभाळामुळे आहे ! आणि तुम्ही आम्ही विसरू नये की मी +मी =मी स्क्वेअर आपण एकमेकांमुळे आहोत ! तुम्हीही जगा आणि आम्हालाही जगवा ! आपला सद्धम्मान्कित
एक झाड
आनंद दिवाकर चक्रनारायण ,
औरंगाबाद,
विशाल खुणे
दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी
9130466453 / 8975798329