
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई: गेल्या 20-25 वर्षांमध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह गोठवून नंतरच त्यावर अंतिम निर्णय दिल्याचा इतिहास आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं मला कोणतंही आश्चर्य वाटलं नाही अशी पहिली प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
कार्यपद्धतीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय असल्याचंही ते म्हणाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर त्यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “केंद्रीय निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिला आहे तो त्यांच्या कार्यपद्धतीला धरुनच दिला आहे. अंतिम निर्णयाच्या वेळी एकनाथ शिंदेंची बाजू वरचढ ठरेल अशी अपेक्षा आहे.”
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामागे भाजपचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “शिवसेनेने नवीन नावं सांगितली आहेत त्यामागे शरद पवार असल्याचं सांगितलं जातं. बोलणारे काहीही बोलत राहतील. गेल्या निवडणुकीच्या वेळी मोदींच्या नावावर निवडून आलेत. त्यांचे 18 खासदार आणि 56 आमदार हे नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आले आहेत. मोदी यांचे नाणे खणखणीत आहे आणि ते कायम राहील.”
दहीहंडी उत्सवाच्या वेळी जखमी झालेल्या गोविंदाच्या मृत्यूवर विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही दुर्दैवी घटना आहे. पुढील वर्षी आपण अधिकची काळजी कशी घेता येईल यावर भर देऊ.
शिवसेनेचं चिन्ह गोठवलं
केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दोन्ही बाजूने करण्यात दावे, सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाने शिवसेनेवर दावा करत निवडणूक आयोगात धाव घेतली होती. शिंदे गटाने आपल्याकडे 40 आमदार आणि 12 खासदारांचे पाठबळ असल्याचे निवडणूक आयोगाला सांगितले. त्याशिवाय पक्षाचे काही पदाधिकारीदेखील सोबत असल्याचा दावा शिंदे गटाने केला होता. तर दुसरीकडे पक्षाची कार्यकारणी, संघटनात्मक ताकद आपल्या पाठिशी असल्याचा दावा ठाकरे गटाने केला होता. पक्षाची घटना सर्वोच्च असून त्यानुसार निवडण्यात आलेली कार्यकारणी उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे ठाकरे गटाने म्हटले होते.