
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यांनी ठरवले तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे आता खोटे बोलणे बंद आणि प्रत्यक्ष कृती करावी, यासाठी नोव्हेंबरमध्ये अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या नेतृत्वात एक लाखाचा मोर्चा घेऊन जाणार आहोत, असे संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मराठा मुलांना नोकरी मिळाली नाही तर ते नक्षलवादी होऊन सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडतील, असा इशाराही त्यांनी दिला.
ते म्हणाले की, २७ वर्षांपासून अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना संघर्ष करत आहे. संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील यांनी आपले आयुष्य समाजासाठी खर्ची घातले आहे. ४८ मराठा तरुणांनी बलिदान दिले. गांधीजींच्या अहिंसा व लोकशाही मार्गाने ५८ मोर्चे निघाले. तरी सरकारला कळत नसेल तर आगामी काळात ज्या भाषेत कळेल त्याच भाषेत सांगण्यासाठी १ लाख छावे मुंबईला जाणार आहेत.
त्याचे नियोजन आजपासूनच सुरू झाले आहे. पहिला विभागीय मेळावा मंगळवारी औरंगाबादेत आम्ही घेतला आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही मेळावे घेऊन जनजागृती केली जाणार असल्याचे जावळे पाटील यांनी सांगितले. या वेळी कार्याध्यक्ष भीमराव मराठे, विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, प्रदेश संघटक बालाजी सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, किशोर शिरावत आणि मोठ्या संख्येने छावा कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वराज्य संघटनेबाबत काहीही बोलण्यास दिला स्पष्ट नकार छावे आता स्वराज्य संघटनेत चालले आहेत. स्वराज्य आणि छावे याबाबत काय सांगाल, या प्रश्नावर ते म्हणाले की, अखिल भारतीय छावा संघटनेने २७ वर्षांपासून त्यांना मोठे केले. ते आज राजकीय स्वार्थापोटी तिकडे चालले आहेत. स्वराज्य संघटनेबाबत मी काही बोलणार नाही. आमची भूमिका समाजसेवा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री शिंदे समाजाचे प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष जावळे पाटील म्हणाले : समाजाची वाट लावणाऱ्या मराठा समन्वयकांची बँक खाती तपासावीत, यासाठी आम्ही सीबीआय, ईडी, पोलिसांकडे पाठपुरावा करणारच आहोत. त्यांच्याकडे पैसा कसा आला? गाड्या कधी खरेदी केल्या? त्यासाठी पैसे कुणी दिले? मुंबईला जाऊन आणि फेसबुक लाइव्ह करणाऱ्या व समाजाच्या नावाने राजकीय नेत्यांकडून पैसे लाटणाऱ्यांना आम्ही धडा शिकवणार असल्याचेही जावळे पाटील म्हणाले