
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान विद्यापीठ परिसरात होणार आहे. सहा विभागांत ३६ कला प्रकारांत हा महोत्सव रंगणार आहे, अशी मंगळवारी पत्रकार परिषदेत कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात आयोजित पत्रकार परिषदेस प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, संयोजक डॉ. संजय सांभाळकर व संजय शिंदे यांची उपस्थिती होती. कुलगुरु म्हणाले, महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे, लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी ११ वाजता होईल.
उद्घाटनाच्या दिवशी सकाळी ८ वाजता शोभायात्रा काढण्यात येईल. समारोप सोहळ्यास प्रख्यात अभिनेते भरत गणेशपुरे व सुहास शिरसाठ यांची उपस्थिती राहील. मुख्य रंगमंचावर १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता समारोप व बक्षीस वितरण समारंभ होईल. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ही युवक महोत्सवाची ‘थीम’ (मध्यवर्ती कल्पना) असणार आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी १३६ महाविद्यालयांच्या १६५० कलावंतांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे, अशी माहितीही कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.