
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास देशाच्या संपत्तीत वाढ होईल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे, दि. १९: देशाची अर्धी लोकसंख्या असलेल्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास देशाच्या संपत्तीत भरीव वाढ होईल, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पुण्यश्री महिला बचत गटाची उत्पादने व किराणा मालाचे दुकान याजनेंतर्गत मावळ तालुक्यातील वडेश्वर येथील संतोषी माता महिला स्वयंसहायता गटाच्या दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, माजी आमदार दिगंबर भेगडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारगावकर, मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत आदी उपस्थित होते.
पालकमंत्री यावेळी म्हणाले, पूर्वी पुरुषांच्या बरोबरीने महिला शिक्षण घ्यायच्या. मात्र इ.स. १२०० नंतर विविध परकीय आक्रमकांमुळे महिलांना कुटुंबात बंद केले गेले. शेती, युद्धात, पुरुषांच्या बरोबरीने काम करणारी महिला घरात अडकून राहिली. स्वातंत्र्यानंतर शिक्षणात महिलांचे प्रमाण वाढले परंतु अर्थार्जनात त्यांचा टक्का अजूनही कमीच आहे. त्यामुळे देशाची संपत्ती वाढण्यात महिलांचे प्रमाण कमी राहिले आहे. आता केंद्र शासन महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात संधी देण्यासाठी धोरणे आणि योजना राबवत असल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली आहे.
श्री. पाटील पुढे म्हणाले, देशाच्या आर्थिक विकासात महिलांचा वाटा असावा असा प्रयत्न असून त्यासाठी महिलांची बुद्धिमत्ता कामी आली पाहिजे. महिलांनी कोणताही व्यवसाय हौस म्हणून नव्हे तर उत्पन्न मिळवणे हा उद्देश ठेवून करावा.
महिलेचा केवळ गृहिणी हा परिचय असू नये तर घरात बसूनही काहीतरी उत्पादन करते आणि त्यातून पैसा कमावते ही स्थिती झाली पाहिजे.
बचत गटाच्या महिला पापड, लोणची अशा पारंपरिक उत्पादनातून सुरुवात करत आता अनेक नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करत असून त्यांना विक्रीची व्यवस्था करून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतल्याबद्दल श्री. पाटील यांनी जिल्हा परिषदेचे कौतुक केले.
टाकवे ते खांडी रस्ता दुरुस्ती करण्यात येईल असे घोषित करून तात्काळ याचे अंदाजपत्रक करून पुढील प्रक्रिया करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
यावेळी संतोषी माता बचत गटास २ लाख अनुदानाचे पत्र श्री. पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. गटाच्या एका महिलेस २० हजार याप्रमाणे १० महिलांच्या गटास २ लाख रुपये अनुदान आणि ५ लाख रुपये बँक कर्ज असे ७ लाख रुपयांतून बचत गटाने हे दुकान सुरू केले आहे.
मंत्री श्री. पाटील यांनी बचत गटाच्या १ हजार रुपयांच्या उत्पादनांची खरेदी केली. बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करून महिलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
आयुष प्रसाद म्हणाले, आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध करून देऊन लोकांच्या जीवनात बदल घडवण्याला प्राधान्य देण्याची पुणे जिल्हा परिषदेची भूमिका राहिली आहे. त्याच भूमिकेतून पुण्यश्री योजना राबवण्यात येत असून पुणे जिल्हा परिषदेच्या स्थापनेला ६० वर्षे होत असल्यामुळे या योजनेंतर्गत जिल्ह्यात ६० ठिकाणी दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात २ लाख ५० हजार बचत गट स्थापन झालेले आहेत. बचत गटांना गेल्यावर्षी २०२ कोटी रुपये तर यावर्षी आतापर्यंत १४० कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे.
अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी १६ कोटी अनुदान देण्यात आले असून २१५ अंगणवाड्या बांधून झाल्या आहेत. त्यातील एका अंगणवाडीचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते होत असल्याचे श्री. प्रसाद यांनी सांगितले.
यावेळी पुण्यश्री योजनेच्या बोधचिन्हाचे उद्घाटनही मंत्री पाटील यांच्या हस्ते.
कार्यक्रमास महिला व बालविकास अधिकारी विशाल कोतागडे, वडेश्वर- माऊ ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच छाया हेमाडे, ग्रामपंचायत सदस्य, बचत गटाच्या महिला आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते मोरमारेवाडी अंगणवाडी केंद्राच्या नवीन इमारतीचेही उद्घाटन करण्यात आले.