
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : महसूल विभाग अंतर्गत ‘तलाठी’च्या 4000 पदांची भरती होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होतं.
राज्यात तलाठी संवर्गाची 12,500 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 1028 नियमित पदे रिक्त आहेत तर 3165 वाढीव पदे रिक्त आहेत सोबतच 528 मंडळ अधिकाऱ्यांची पदे सुद्धा या रिक्त आहेत. अशी माहिती या बैठकीच्या माध्यमातून समोर आलेली आहे. यातून तलाठ्यावर आणि मंडळ अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त बोजा वाढलेला आहे. या सर्व रिक्त पदावर डिसेंबर अखेरपर्यंत भरती केली जाईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज्यात विभागनिहाय तसेच जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असलेल्या एकूण 12636 पदांपैकी 8574 पदे स्थायी असून, त्यापैकी उर्वरित 4062 पदे अस्थायी आहेत. राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयांच्या माहितीवरून, सदर पदांपैकी कोणतेही पद सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहे. सबब, प्रपत्र-अ मधील स्तंभ क्र. 5 मध्ये नमूद केलेल्या तलाठी संवर्गाच्या एकूण 4062 अस्थायी पदांना 14 ऑक्टोबर रोजी प्रकाशीत झालेल्या शासन निर्णयाव्दारे मुदतवाढ देण्यात आलेली आहे.