
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर मनोरंजन श्रुष्टीशी संबंधित अनेक प्रसिद्ध कलाकारांची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आली होती.
यामध्ये कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया सहभाग होता. आता या प्रकरणातील ताजे अपडेट समोर आले आहे, एनसीबीने या दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून लवकरच या दोघांविरुद्ध न्यायालयात खटला सुरू होणार आहे. एनसीबीने विशेष एनडीपीएस कोर्टात 200 पानांचे आरोपपत्र दाखल केले.
कॉमेडियन भारती आणि तिच्या पतीला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात त्यांच्या घरातून अटक केली होती. मात्र, सध्या दोघेही जामिनावर बाहेर आहेत. एनसीबीने भारती सिंगच्या घरातून ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतरच एनसीबीने गुन्हा नोंदवून या दोघांना अटक केली होती.
घरातून संशयास्पद साहित्य सापडले
21 नोव्हेंबर 2020 रोजी, NCB ने भारती सिंग आणि तिच्या पतीच्या प्रोडक्शन-हाउस ऑफिस आणि निवासस्थानावर छापा टाकला होता त्यावेळी त्याच्या घरातून 86.5 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता.
त्यानंतर या जोडप्याला अटक करण्यात आली. दोघांनाही न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात असता त्यांना ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, या जोडप्याला 23 नोव्हेंबर रोजी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयांची सुरक्षा ठेव जमा केल्यानंतर जामीन मंजूर केला.
14 जून 2020 रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर मनोरंजन क्षेत्रात ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनाही अटक केली होती. याशिवाय सारा अली खान, श्रद्धा कपूर यांसारख्या अनेक प्रसिद्ध स्टार्सचीही चौकशी करण्यात आली होती.