
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरातील नारायण चाळ परिसरात असलेल्या शॉपीतून लंपास केलेल्या सुमारे चार लाख एकशे सत्याऐंशी रुपयांच्या मुद्देमालासह दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात परभणीच्या स्थागुशाच्या पथकाला यश मिळाले आहे. परिणामी मागील काही दिवसांपासून टीकेचे लक्ष्य बनलेल्या परभणी पोलिसांना तात्पुरता का होईना परंतु दिलासा मिळाला आहे एवढे नक्की.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे समजते की, ऐन दिवाळीच्या धामधुमीत नारायण चाळीतील गिफ्ट वर्ल्ड नावाची मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी त्यातील सुमारे ४८ लाख ५१ हजारांच्या किंमतीचे मोबाईल चोरुन लंपास केल्याचे व त्यापैकी ४ लाख, एक हजार, सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत अधीक्षक सुधाराग आर. यांच्याकडून त्यांच्या कार्यालयात सांगण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सापळा रचून शिताफीने दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले आहे. यात नेमके किती व कोण कोण आरोपी लिप्त आहेत, यांचाही कसून शोध घेतला जात असल्याचे बोलले जात आहे.
मागील काही दिवसांपासून परभणी शहर व परिसरात गुन्हेगारांनी कमालीचा उच्छाद मांडल्याच्या चर्चा पुढे आल्या आहेत. गुन्हेगारीचा वाढलेला रेषो वेळीच ठेचून काढला जाणे महत्वाचे होते. सर्व स्तरातून टीकेची झोड उठवत लक्ष्य केले जात असल्याच्या इर्षेने पोलिसांनी पण तपासासाठी पूरती कंबर कसली होती. स्थागु शाखेद्वारा निरनिराळ्या पथकांच्या माध्यमातून चौकशीला झालेली सुरुवात काही अंशी का होईना परंतु चांगलीच पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. अशीच तत्परता अन्य गुन्ह्यांतील घटनांच्या बाबतीतही पोलिसांनी दाखवून त्याही आरोपींना लवकरात लवकर जेरबंद केले गेले तर परभणी पोलीस निश्चितच कौतुकास पात्र ठरले जातील यात शंकाच नसावी. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या पथकाने केली भरीव कामगिरी पहाता व्यापारी महासंघातही समाधान व्यक्त केले जात आहे. ज्या पथकाने ही कारवाई केली आहे, ती उल्लेखनीय अशीच म्हणावी लागेल.