
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
फुलवळ-मुंडेवाडी-सोमसवाडी- वाखरड या ३२ क्रमांकाच्या ४० फूट रुंदीच्या ग्रामीण मार्गाची दयनीय अवस्था झाली असून हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात रुतला असून सदरच्या रस्त्यास पांदन रस्त्याचे रूप आले आहे तरीही या रस्त्याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींनी ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे फुलवळ ग्रामस्थांसह सोमसवाडी, मुंडेवाडी, वाखरड येथील वाहनधारकसह नागरिकांमधून बोलल्याचे ऐकावयास मिळत आहे.
फुलवळ ते सोमसवाडी, मुंडेवाडी, वाखरड ग्रामीण मार्ग क्रमांक ३२ हा जिल्हा परिषद बांधकाम विभाग, नांदेड यांच्या निगरानित असून या रस्त्याकडे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी गेल्या १५ ते २० वर्षापासून दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यालगत झाडे-झुडपे वाढली आहेत. तसेच अनेकांनी उकिरडे टाकून अतिक्रमण केले आहे. तर उर्वरित रस्त्यावरही भविष्यात असेच अतिक्रमण वाढून रस्ता पूर्णतः नामशेष होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यासाठी संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून तात्काळ रस्त्याचे बांधकाम पूर्ण करणे गरजेचे आहे.
सदरच्या रस्त्यावरून अवजड, चारचाकी वाहन जाणे तर सोडाच, परंतु एकही दुचाकी वाहन या रस्त्यावरून जात नाही, हे वास्तव चित्र आहे. त्यामुळे थेट आपल्या दुचाकीसह अवजड वाहनेही सर्रास फुलवळ ग्रामपंचायत अंतर्गत गावामधील असणाऱ्या अरुंद व वर्दळीच्या रस्त्याचा वापर करत आहेत. सारासार विचार करता गावांतर्गत इमारतीच्या बांधकामाची व वाढत्या लोकसंख्येची व्याप्ती पाहता रस्त्यावर लहान मुलांसह वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच मुंडेवाडी-वाखरड-सोमसवाडी कडे जाणारी अवजड वाहने ही आहेत. त्यातून अपघात होण्याच्या भीतीने ग्रामपंचायत रस्त्यालगतच्या नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.
फुलवळ गावठाणपासून जाणारा मुंडेवाडी, वाखरड व सोमसवाडी ग्रामीण मार्ग क्रमांक ३२ हा ४० फूट रुंदीचा असून गेल्या १५ ते २० वर्षापासून जिल्हा परिषद बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांची उदासीनता व दुर्लक्षामुळे फुलवळ बसस्टँड ते स्मशानभूमी मार्गे सोमसवाडी-मुंडेवाडी-वाखरड हा गावठाण लगतचा रस्ता अंदाजे ६०० ते ८०० मीटर अंतराच्या रस्त्यावरून वाहने जाणे तर बंदच आहेत. परंतु रस्त्यावर काटेरी झुडपे वाढली असून रिकाम्या जागेत उकिरडे टाकल्यामुळे अतिक्रमणाची भीती वाढली आहे. त्यासाठी संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष घालून वाढणारे अतिक्रमण थांबवण्यासाठी या ६०० ते ८०० मीटर रस्त्याचे काम तात्काळ करण्याची गरज असल्याचे फुलवळ ग्रामस्थांसह सोमसवाडी, मुंडेवाडी, वाखरड येथील वाहनधारकासह प्रवाश्यांमधून बोलल्याचे ऐकावयास मिळत आहे.