
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : कारेगाव ग्रामपंचायत क्षेत्रांतल्या एकूण एक नागरिकांना स्वच्छ व नियमित पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी त्याचा कटाक्ष घेत मागील अनेक दिवसांपासून सततचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याचेच फलित म्हणून सुमारे अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेण्यासाठी अखेर कारेगाव ग्रामपंचायतीला भरीव यश प्राप्त झाले आहे. लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार असून शीघ्र गतीने हे काम पूर्णत्वास नेले जावे यासाठी ग्रा.पं.व्यवस्थापन कमिटी अथक परिश्रम घेणार असल्याचे समजते.
जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामे परभणी जिल्हाभरात सर्वत्र जोमाने सुरु आहेत. सदर जलपूर्तीची कामे गुणवत्तापूर्ण आणि जलदगतीने पार पाडली जावीत तसेच त्यांचा लाभ प्रत्येक घरांतील नागरिकांपर्यंत पोहोचला जावा याची काळजी व्यवस्थापन कमिटीमधील सर्व सदस्य कटाक्षाने घेणार असल्याचे नव्हे ते आमचे कर्तव्यच असल्याची ठाम भूमिका कारेगावातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते तथा परभणी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष दिलीप राव आवचार यांनी दैनिक चालू वार्ता शी बोलताना व्यक्त केली.
मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती. त्याचे शल्य मनाला बोचणारे व वेदनादायी असेच होते. याची खंत व्यक्त करुन भरीव यश मिळालेल्या या योजनेतून भविष्यात कोणालाही पिण्याचे पाणी कमी पडणार नाही यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू यांचे अभिवचनही दिलीपराव अवचार यांनी यावेळी दिले. स्वच्छ, मुबलक व नियमित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आमच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना पुरविणे हे आम्ही आमचे परम कर्तव्यच असल्याचे समजतो असे सांगून ते पुढे असेही म्हणाले की, नागरिकांना त्यांच्या मुलभूत गरजा पुरविणे ही आमची प्राथमिकताच असून येणाऱ्या कालावधीत लवकरच रस्त्याच्या कामासाठी सुध्दा आम्ही प्रयत्नशील राहू असे त्यांनी सांगितले. रस्त्याची मोठी समस्या असून ती लवकरात लवकर मार्गी लागावी असाच आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी परभणीचे शिवसेना खासदार संजयजी जाधव यांच्या सहकार्याने आणि शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील यांच्या प्रयत्नातून प्रलंबित रस्ता विस्तारीकरण, सुधारणा, खडीकरण व डांबरीकरण करुन नागरिकांच्या रहदारीचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा असे निर्णायक मत दै.चालू वार्ता चे परभणी जिल्हा उपसंपादक दत्तात्रय कराळे यांनी व्यक्त केले असता त्यावर दिलीपराव अवचार यांनीही सहमती दर्शविली. गावातील नागरिकांनी सामोपचाराने धोरणात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले तर यातून बरेच काही साध्य होऊ शकेल असा विश्वासही यावेळी व्यक्त केला गेला. स्मशानभूमीचे बांधकाम, ग्रामपंचायत इमारतीचे टोलेजंग व आधुनिक पध्दतीचे बांधकाम करुन विद्यमान कमिटीने भरीव कामगिरी केली आहे. वीज व्यवस्था सुरळीत व कायम राहिली जावी यासाठीही विशेष लक्ष दिले जाते. ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे स्त्रोत असलेली घरपट्टी, पाणी पट्टी नागरिकांनी नियमित व वेळेवर अदा केली तर आणि तरच नागरी सुविधा पुरविणे शक्य होईल अन्यथा आर्थिक त्रुटी जाणवली जाईल यात शंकाच नाही. लाईट बील वेळेवर भरणा केला गेला तरच नियमित वीज मिळू शकेल अन्यथा महावितरण कडून वीज कापली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी ग्रामस्थांनी आपले कर्तव्य समजून वागणे व वेळेवर सर्व देयके अदा करणे गरजेचे ठरते. गावाचा सर्वांगीण विकास साधला जावा यासाठी सर्वांचा एकोपा व सहकार्याची भावना अत्यंत महत्त्वाचे असते. याचेही विस्मरण कोणालाच होता कामा नये.
दरम्यान अत्यंत महत्वाची योजना म्हणून तिच्याकडे पाहिले जाते ती पाणी योजना ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी प्रयत्नांती पराकाष्ठाने मिळविण्याचे व त्यासाठी आवश्यक असा अठरा कोटींचा निधी प्राप्त करुन घेणे हे कष्टप्राय असले तरी त्यात मिळालेले यश हे भरीव असेच म्हणावे लागेल एवढे नक्की. गाव परिसरातील स्वच्छतेवर ग्रामपंचायतीने कटाक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नैसर्गिक व घाण पाण्याचा निचरा योग्य रितीने व्हावा यासाठी नाल्या व गटारांची निर्मिती करणे व त्याची देखभाल करणे हे सुध्दा महत्वाचे आहे. त्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. तसे न झाल्यास गावात रोगराईला आमंत्रण व अस्वच्छतेचा बोजवारा उडाला जाईल हे मुळीच नाकारता येणार नाही. तोंडावर निवडणूक आली असून त्या दरम्यान होऊ घातलेली पाणी योजना पूर्णत्वास नेणे गरजेचेची ठरणार आहे. ग्रामपंयतीने त्यासाठी केलेले प्रयत्न सार्थकी ठरले आहेत. येणारे पाणी व्यवस्थित वापरले जाईल याचा कटाक्ष सर्वांनीच राखला पाहिजे.