
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : संपूर्ण राज्यभरात विशेषतः परभणी सह संपूर्ण मराठवाड्यात आत्महत्येच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शासन यावर धोरणात्मक असा कोणताही ठोस निर्णय घेत नसून केवळ आणि केवळ “आत्महत्यामूक्त महाराष्ट्र” करु असे कितीही सांगितले जात असले तरी शासनाची ही घोषणा निव्वळ फसवी असल्याचा घणाघात विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी नुकताच परभणी येथे केला आहे.
राज्यभरात सर्वत्र झालेल्या पर्जन्यवृष्टी व परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. अस्मानी संकटाचा सामना करणे अशक्यप्राय शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळला जावा यासाठी शासनाने जी गंभीरता दाखवणे आवश्यक होते, तशी कोणतीही कृती अंमलात न आणता प्रशासनाला मात्र वरकरणी आदेश दिले. परिणामी खोट्या नोंदी करुन शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या व त्यांची फसवणूक करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मात्र कोणतीही कठोर कारवाई केली नाही. त्याचाच परिपाक म्हणून देशोधडीला लागलेल्या हा शेतकरी वैफल्यग्रस्त बनला जाऊन प्रसंगी त्यांने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले नव्हे ती पाळी फक्त आणि फक्त या सरकारमुळेच आली आहे अशी तीव्र टीका करुन श्री. दानवे पुढे असेही म्हणाले की, एका बाजूला संपूर्ण राज्यभरातील शेतकरी निर्माण समस्येमुळे पूरता व्याकूळ होऊन मेटाकुटीला आला होता तर दुसरीकडे मदतीसंबंधीची धोरण प्रणाली ठोस न राबवता सत्तेसाठी मश्गूल हे सरकार मात्र आपापसातील मलिद्यासाठीच भांडत राहिले. हे शेतकऱ्यांचं दुर्देव म्हणावं लागेल, राज्याचं दुर्दैव म्हणावे लागेल असं सांगून दानवे यांनी आगामी काळात लवकरात लवकर सरसकट पंचनामे व सरसकट मदतीचे कार्य सुरु नाही केल्यास मात्र विरोधीपक्ष म्हणून आम्हाला राज्यभर तीव्र आंदोलनात्मक पवित्रा घ्यावाच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.